MLC Election : राज्यसभा निवडणुकीपाठोपाठ विधानपरिषद निवडणूक रंगतदार होणार आहे. कारण भाजपने पाचवा उमेदवार मैदानात दिला आहे. तर तिकडे काँग्रेसनेही दुसऱ्या उमेदवार मैदानात उतरवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रसाद लाड पाचवा उमेदवार म्हणून मैदानात उतरले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत काय होईल याची उत्सुकता आहे. भाजपने आज आपली उमेदवार यादी जाहीर केली. यात भाजपच्या वतीने प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उमा खापरे, प्रसाद लाड यांना संधी दिली आहे.
भाजपच्या उमेदवार यादीची वैशिष्ट्ये
- 1. संघटनेत काम करणाऱ्या दोन उमेदवारांना उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना संधी देऊन भाजपने कार्यकर्त्यांना संदेश दिला आहे.
- 2. तसेच यावेळी भाजपने घटक पक्षाला उमेदवारी दिली नाही.
- 3. पंकजा मुंडे की चित्रा वाघ या चर्चेत महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना लॉटरी लागली
- 4. राज्यसभेपाठोपाठ विधान परिषदेवर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देणं टाळलं त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना कुठली संधी मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
- 5. पराभूत झालेल्या राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात आलं, ओबीसी चेहरा म्हणून संधी
- 6. देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना पुन्हा संधी
भाजपने पाच उमेदवार दिले असले तरीही पाचवा उमेदवार निवडून येणे सोपे नाही.
विधानपरिषदेवर निवडून येण्याचे गणित काय?
- विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 28 मतांची आवश्यकता आहे.
- भाजप आणि मित्रपक्ष यांचं संख्याबळ 112 इतकं आहे.
- त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात.
- महाविकास आघाडीकडे 169 संख्याबळ आहे.
- त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील.
- तर मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.
काँग्रेसकडून मुंबईकरांना संधी
दुसरीकडे विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या दोन उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. काँग्रेसने दोन्ही जागांवर मुंबईकरांना संधी दिली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप आणि माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संख्याबळानुसार काँग्रेसचा एक उमेदवार सहज विजयी होणार आहे. तर, दुसऱ्या जागेसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससह इतरांची मदत काँग्रेसला घ्यावी लागणार आहे.
भाजपने पाचवा आणि काँग्रेसने दुसरा उमेदवार दिल्यामुळे ही निवडणूक रंगतदार होणार आहे. अर्थात राज्यसभेची निवडणूक कोण जिंकतं यावरच विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असेल.