ठाणे : राज्यासह परराज्यात ज्वेलर्स आणि फायनान्स कंपन्यांची रेकी करून त्यावर दरोडा टाकणाऱ्या अंतरराष्ट्रीय टोळीचे सराईत 15 आरोपींच्या मुसक्या ठाणे पोलिसांनी आवळल्या आहेत. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारावर ठाणे पोलिसांच्या पथकांनी विविध ठिकाणाहून तब्बल 15 सराईत घरफोडी करणाऱ्यांना अटक केली.
टोळीतील अटक असलेल्या आरोपींमध्ये झारखंड, नेपाळ आणि उत्तराखंड येथील आरोपींचा समावेश आहे.
ठाण्याच्या नौपाडा येथील मुथूट फायनान्स कंपनीवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने आरोपी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी विविध पथके तयार करून खबऱ्यांचा सापळा रचला.
घोडबंदर रोडवरील चन्ना गावातील हॉटेल रॉयल हेरीटेजमधून आरोपी अब्दुल मजीद हसन शेख, उमर रज्जाक खातीब शेख, असुद्दिन कुर्शोड शेख या त्रिकुटाला नौपाडा येथून अटक केली. हे सर्व आरोपी झारखंड येथील राहणारे आहेत.
पोलिसांच्या दुसऱ्या पथकाने घोडबंदरमधील चन्ना गावातीलच द्वारका हॉटेलमधून महमद जमील अख्तर अली, बरकत अबुल शेख, सेनाउल कुलास शेख त्रिकुटाला अटक केली. हेसुद्धा झारखंड येथील राहणारे आहेत.
तीनहात नाका येथील पथकाने राजकुमार उर्फ भोला उर्फ मिस्त्री बाबूलाल शर्मा, तापल उर्फ तप्पू भगवान मंडल यांना अटक करण्यात आली. तर वसंत विहार चौक ठाणे येथून आरोपी दिनेश प्रभू गुप्त, ओमप्रकाश भददु मंडळ, बाबू बादशाह मुजावर, राजू केदार यादव आणि दशरथ गंगाराम बहादूरसिंग यांचा समावेश आहे.
विविध पोलीस पथकांनी ताब्यात घेतलेल्या 15 आरोपींकडून पोलिसांनी हत्यारे, चॉपर, तलवार, गेस पाईप, पक्कड, पाना, गेस कटिंग नोझल,मिरची पूड, दोरी,ऑक्सिजन गेस सिलेंडर, डोमेस्टिक गेस सिलेंडर्स, 16 मोबाईल फोन,सेन्ट्रो कर असा 1 लाख 85 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपींनी मुथूट फायनान्स नौपाडा याच्यावर दारोडा टाकण्याची योजना असल्याची कबुली दिली आहे. या टोळीने यापूर्वी अनेक ठिकाणी राज्यात आणि पर राज्यात ज्वेलर्सच्या आणि फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडे घातले आहेत.
या आरोपींनी झहीराबाद येथील मुथूट फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर दरोडा टाकून तब्बल 77 किलो सोने लांबवले होते. तर उल्हास नगर येथे मणिपुरम उल्हासनगर येथून दरोडा टाकून 28 किलो सोने लांबवले होते.
या आरोपींनी उतराखंड, गुजरात इत्यादी राज्यात दरोडे टाकून कोट्यावधीची लूट केलेली आहे. या टोळीत तब्बल 50 पेक्षा अधिक सराईत गुन्हेगार असावेत असा अंदाज पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी व्यक्त केला आहे. तर या टोळीतील सदस्य आपली ओळख आंब्याचे व्यापारी म्हणून जातील तिथे करतात. आंब्याचा व्यवसाय करण्यासाठी ते भाड्याने ज्वेलर्स किंवा फायनान्स कंपनीच्या बाजूलाच दुकान भाड्याने घेतात आणि मग भिंती तोडून दुकानात प्रवेश करत लूट करतात.
अटकेतील आरोपींना न्यायलयात नेले असता, न्यायलयाने त्यांना 28 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.