Thane News: ठाण्यातील पोलिस दलात खळबळ उडाली आहे. कारण आज ठाण्याचे पोलिस आयुक्त जगजीत सिंग यांनी एकाच दिवशी मुंब्रा पोलीस स्थानकातील तीन अधिकारी आणि सात कर्मचाऱ्यांचे निलंबन केले आहे. त्यासोबत याच पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक आणि या विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त तसेच निलंबित झालेल्या सर्वांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश जगजीत सिंग यांनी काढले आहेत. मुंब्रा विभागात राहणाऱ्या एका खेळणी व्यापाऱ्याकडून सहा कोटी रुपये लुटण्याचे हे प्रकरण आहे. ही चौकशी पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे करणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात एकाच पोलिस स्टेशन मधील अधिकारी आणि कर्मचारी निलंबित होण्याची ही गेल्या काही वर्षांत मधली पहिलीच घटना मानली जात आहे. 


मुंब्रा येथील बॉम्बे कॉलनी भागात राहणारे खेळण्यांचे व्यापारी फैजल मेमन यांच्या घरी 12 एप्रिल रोजी रात्री 12.30 च्या सुमारास पोलिसांनी खोटी धाड घातली. मेमन यांच्या घरातून 30 बॉक्स जप्त करण्यात आले. या प्रत्येक बॉक्समध्ये एक कोटी याप्रमाणे 30 बॉक्समध्ये 30 कोटींची रोकड होती. हे 30 कोटींचे 30 बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांनी साक्षीदारांच्या उपस्थितीत ताब्यात घेतले. हे बॉक्स मध्यरात्री पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी मेमन यांना दमदाटी करून त्यातील सहा बॉक्स मुंब्रा पोलीस ठाण्यातच स्वतःकडे ठेवून घेतले आणि 24 बॉक्स मेमन यांना परत केले.


मुंब्रा पोलिसांनी ठेवून घेतलेल्या सहा बॉक्समध्ये प्रत्येकी एक कोटीप्रमाणे सहा कोटी रुपये होते. ही रोकड मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांच्या केबिनमध्ये मोजण्यात आली. ही तोडबाजी केल्यानंतर मुंब्रा पोलिसांनी या प्रकरणाबाबत आळीमिळी गुपचिळी ठेवली. परंतु इब्राहिम शेख नामक एका व्यक्तीने या घटनेबाबत ठाण्याच्या पोलीस आयुक्तांसह गृहखात्याला पत्र लिहून माहिती दिली. मुंब्रा पोलिसांच्या या तोडबाजीचे सीसीटीव्ही फुटेजसह वृत्त प्रसारित होताच ठाणे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. त्याच दिवशी पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीताराम शेवाळे यांचा चार्ज काढून घेण्यात आला आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी तत्काळ परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांना याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते.
 
या दहा जणांवर बडगा


या चौकशीत मुंब्रा पोलीस ठाण्याचे दहा कर्मचारी सकृतदर्शनी दोषी आढळल्याचा अहवाल उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी दिला. त्यानंतर आज ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंह यांनी मुंब्रा पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद काळे, रविराज मदने यांच्यासह पोलीस नाईक पंकज गायकर, जगदिश गावीत, दिलीप किरपण, प्रवीण कुंभार, अंकुश वैद्य, पोलीस शिपाई ललित महाजन, नीलेश साळुंखे यांना तत्काळ निलंबित केले असून त्यांची खातेनिहाय चौकशी केली जाणार असल्याचे  जयजित सिंह यांनी स्पष्ट केले. दरम्यान याप्रकरणी परिमंडळ एकचे सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे, मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कडलग यांचेही जबाब परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्यामार्पâत नोंदवले जाणार असल्याचे जयजित सिंह यांना सांगितले.