मुंबई : ठाणे (Thane News) शहरातील किसननगर भागात उभारण्यात येणाऱ्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक क्लस्टर पुनर्विकास योजनेतील नवीन प्रकल्पाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शनिवारी भूमिपूजन झाले. ठाणे शहरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनक्षेत्रामध्ये निसर्ग पर्यटनाच्या सुविधा विकसित करण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या ‘आनंदवन’ उपक्रमातील कामांचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले. येऊर येथील नेचरपार्क आणि इतर विविध विकासकामांचा ई-शुभारंभदेखील यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला.
क्लस्टरसाठी अनेक वर्षे संघर्ष करावा लागला, साईराज बिल्डिंगची दुर्घटना अजूनही लक्षात आहे. त्यातील 18 जण मृत्युमुखी पडले, ही घटना माझ्या मनाला चटका लावून गेली. धोकादायक इमारती सर्वांनाच काळजी टाकणाऱ्या असतात. या पार्श्वभूमीवर ही योजना राबविण्याचा संकल्प केला. काही इमारती अनधिकृत जरी असल्या तरी त्यातील जिवंत माणसे, त्यांचा जीव महत्त्वाचा, ही माणुसकीची भावना महत्त्वाची, या भावनेतूनच क्लस्टर योजनेचा जन्म झाला. क्लस्टर योजनेत काही त्रुटी होत्या मात्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्या त्रुटी दूर करण्यात त्यांनी मोलाचे सहकार्य केले असे सांगून महापालिका आयुक्त, सिडको व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी आणि वनविभाग यांनी संयुक्तपणे ही योजना यशस्वीपणे पूर्णत्वास आणावी असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.
आशियातील पहिला मोठा प्रकल्प
क्लस्टर पुनर्विकास योजनेच्या पहिल्या टप्प्यात साडेदहा हजार घरांचे काम पूर्णत्वास जाणार आहे, पुढील काम हे दोन टप्प्यातच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. क्लस्टर योजनेसाठी पूर्वी काम केलेल्या कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. पंधराशे हेक्टर भूखंडावर होणारा हा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिला इतका मोठा क्लस्टर पुनर्विकास प्रकल्प आहे असे सांगून समाजासाठी जगण्याची धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण घेवून मी आता जगतोय आणि मुख्यमंत्रीपदाचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवन बदलण्यासाठी करण्याचा प्रयत्न करतोय, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
‘आनंदवन’ उपक्रम -
केंद्र सरकारच्या मदतीमुळे राज्यातील अनेक प्रकल्प मार्गी लागत आहेत, याबद्दल केंद्र शासनाचे आभार मानून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने ‘आनंदवन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. ‘आनंदवन’ ही संकल्पना मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त असून या योजनेंतर्गत ठाण्यातील पहिल्या टप्प्यात 27 किलोमीटर आणि 500 मीटर रुंदीचा श्रीनगर ते गायमुख या भागात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. या माध्यमातून जास्तीत जास्त वृक्षारोपण, ग्रीन पॅच, ऑक्सिजन पार्क, अर्बन फॉरेस्ट हे उपक्रम राबविले जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
केवळ इमारती उभ्या करायच्या नाहीत तर नियोजित शहर निर्माण करायचे आहे. येथील लोकांना आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा मिळायला हव्यात. क्लस्टर हा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा असून गरजूंना त्यांच्या हक्काची उत्तम दर्जाची घरे मिळवून देण्यास मुख्यमंत्री या नात्याने मी कटिबद्ध असून ‘आनंदवन’, ‘क्लस्टर’ आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम या अभियानाचा परिणाम निश्चितच येत्या काळात सकारात्मक आणि विकासात्मक दृष्टीने दिसून येईल. भविष्यात ठाण्यातील व राज्यातील इतर शहरांचाही क्लस्टर पुनर्विकासाच्या माध्यमातून विकास केला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.