उस्मानाबाद : कोरोना महामारीमुळं शाळा बंद असल्याने ऑनलाईन वर्गाद्वारे अभ्यास अशा उपक्रमांचा गेल्या सहा महिन्यातील परिणाम जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग विद्यार्थ्यांची व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून चाचणी घेणार आहे. यंदा चाचणी परीक्षा, सहामाही परीक्षा असे वर्षाचे वेळापत्रक अंमलात आलेले नाही. वर्गातील अध्यापनाप्रमाणे नाहीतर ऑनलाईन वर्ग घेण्यात आले. दूरचित्रवाणी, रेडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न झाले.
रोज व्हॉट्सअॅप, एसएमएसच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास, साहित्य पोहोचवण्याचा प्रयत्न विविध स्तरावरून करण्यात आला. या प्रश्नाचं नेमकं फलित काय आहे हे जाणून घेण्यासाठी शिक्षण विभाग आता विद्यार्थ्यांच्या चाचणी घेणार आहे.
व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून या चाचण्या होतील. व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून विविध चाचणीची लिंक विद्यार्थ्यांना पाठवण्यात येईल. विद्यार्थ्यांना बहुपर्यायी स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात येतील. चाचणी दिल्यावर किती उत्तर बरोबर आली हेही विद्यार्थ्यांना लगेच कळेल. परंतु ऑनलाईन शिक्षणाचा बऱ्याच भागांमध्ये बट्ट्याबोळ झाला आहे, अशी शिक्षक संघटनांची तक्रार असताना विद्यार्थ्यांची चाचणी घेणे गरजेचे आहे का? हाही मुद्दा पुढे येऊ शकतो.
अकरावी प्रवेशपूर्वीच अकरावीच्या ऑनलाईन वर्गाला सुरुवात
मराठा आरक्षण स्थगितीमुळे रखडलेल्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये, म्हणून नोव्हेंबर पहिल्या आठवड्यापासून ऑनलाइन वर्ग सुरू केले जाणार आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय आणखी 4 आठवडे लांबणीवर पडल्याने अकरावी प्रवेश प्रक्रिया केव्हा आणि कशी सुरु होईल याबाबत अद्याप स्पष्टता नाही.
या लांबणीवर पडलेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे अकरावीचे शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत प्रश्नचिन्ह आहे. दरम्यान या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाला दिलासा मिळावा आणि विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेचा अभ्यास सुरु करता यावा याकरिता प्रवेशाबाबत अंतिम निर्णय होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला आहे.अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अभ्यासाचा हा उपक्रम या आठवड्यात सुरु करण्याचा विचार असल्याची माहिती राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद( एससीईआरटी)चे संचालक दिनकर पाटील यांनी दिली आहे. या माध्यमातून विशेषतः विज्ञान, वाणिज्य, कला या शाखांमधील सर्वाधिक घेण्यात येणारे विषय किंवा बंधनकारक असलेल्या विषयांच्या तासिका ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. या ऑनलाईन तासिका कोणत्या व्यासपीठावर , कशा आणि किती वेळासाठी उपलब्ध होतील यासंदर्भातील अधिक माहिती लवकरच देण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.