अहमदनगर : ऊसदर आंदोलनातील शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घ्या, अन्यथा इथून पुढे उपचार घेणार नाही, असा इशारा उद्धव मापारी यांनी दिला आहे. उद्धव मापारी हे ऊसदर आंदोलनावेळी पोलिसांच्या गोळीबारात जखमी झाले आहेत. त्यांच्या छातीला गोळी लागली आहे.

"बुधवारी ऊस आंदोलनात पोलिसांनी मला गोळ्या घातल्या. माझ्या सहकाऱ्यांवरचे गुन्हे जर प्रशासनाने मागे घेतले नाहीत, तर इथून पुढचा उपचार घेणार नाही. याची सरकारने दखल घ्यावी.", असे उद्धव मापारी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.

दोन शेतकऱ्यांवर गोळीबार

ऊसाला 3100 रुपये दर द्यावा यासाठी अहमदनगरमध्ये करण्यात आलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. शेवगावमध्ये आंदोलकांनी जाळपोळ केली, तर आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराचे नळकांडे फोडले. इतकंच नाही तर पोलिसांनी गोळीबार केला.

या गोळीबारात उद्धव मापारी आणि बाबूराव तुकळे हे दोन शेतकरी जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दोन्हीही शेतकरी पैठणचे रहिवासी आहेत.

संबंधित बातम्या :

पोलीस शेतकऱ्यांच्या छातीऐवजी पायावर गोळी मारु शकत होते : दानवे

शेतकऱ्यांवर लाठीकाठी चालली नाही पाहिजे : सदाभाऊ

सहकार मंत्र्यांच्या घरासमोर आंदोलकांनी रक्ताच्या बाटल्या फोडल्या

पंढरपुरात ऊसदर आंदोलनं चिघळलं, एसटीची तोडफोड