Nagpur Congress News : नागपुरातील अंबाझरी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडणाऱ्यांना प्रशासन पाठीशी घालत आहे. यासंदर्भात अनेकवेळा आंदोलनही झाले, मात्र शासनाकडून दोषींवर अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. उलट दोषींना प्रशासन पाठीशी घालत आहे असा आरोप कर या विरोधात आज नागपुरात काँग्रेसने आंदोलन केले. अंबाझरी उद्यानात बांधकामाच्या नावावर हे स्मारक पाडण्यात आल्याचा आरोप काँग्रेसचा आहे. शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे (MLA Vikas Thakre) यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले.


दरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये चांगलीच झटापटही झाली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येत कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकत्र आले. यावेळी महिला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही उपस्थिती लक्षणीय होती. घोषणाबाजी सुरू झाली आणि कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा पोलिसांना त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली. काही काळासाठी परिसरात तणाव होता, मात्र नंतर कार्यकर्त्यांनी पोलिसांना सहकार्य केले.


दोषींना वाचविण्याचा प्रयत्न का?


यासंदर्भात अनेकदा निवेदन, आंदोलन करण्यात आले, मात्र यावर कारवाई झाली नाही, त्यामुळं आज आंदोलन करत असल्याचं विकास ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. दरम्यान कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यात झटापट झाली. यावेळी तेथे चांगलाच गोंधळ उडाला होता. आज दुपारी नागपूर शहर (जिल्हा )काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले.


अंबाझरी उद्यानातील आंबेडकर भवन तोडणाऱ्यांवर कारवाई करून नव्याने आंबेडकर भवन बांधणे, बिरसा मुंडा भवन नियोजित जागी बनविणे, पेट्रोल डिझेल दरवाढ, महागाई, बेरोजगारी या मुद्द्यांवर कॉंग्रेस कार्यकर्त्यांना प्रचंड घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. तसेच दोषींना वाचविण्याचा प्रयत्न प्रशासन का करत आहे हे देखील स्पष्ट करावी अशी मागणी आक्रमक कार्यकर्त्यांनी केली. यावेळी प्रदेश पदाधिकारी, शहर कार्यकारिणीचे पदाधिकारी, सर्व सेल अध्यक्ष व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


पंधरा दिवसांचे आश्वासन कधी संपणार 


अंबाझरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन गेल्या कित्येक वर्षांपासून आहे. सरकारने ही 44 एकर जागा खासगी व्यक्तीला दिली. त्यानंतर त्याने आंबेडकर भवन तोडले. यामुळे नागपूरकरांचा स्वाभिमानाला ठेच लागली आहे. विनापरवानगी हे भवन तोडल्यामुळे त्या व्यक्तीवर कारवाई करावी, गुन्हे दाखल करावे, अशी मागणी आम्ही केली आहे. पण त्याकडे सरकार लक्ष देत नाहीये. यापूर्वीही आम्ही मागणी केली असता, 15 दिवसांत कारवाई करण्याचे आश्‍वासन मिळाले होते. पण कारवाई झाली नाही, असे आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले. यापुढे आंदोलन अधिक तीव्र करू, असेही आमदार ठाकरे यांनी स्पष्ट केले.


ही बातमी देखील वाचा...


शिंदे गटाच्या संपर्क प्रमुखाला नागपूर महानगरपालिकेची नोटीस; जागेच्या मालकीबाबत प्रश्न प्रलंबित, मात्र व्यवसाय जोरात