Kolhapur News : एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिरोळ तालुक्यातील तीन कारखान्यांची ऊसतोड रोखल्यानंतर स्वाभिमानीने आता पन्हाळा तालुक्यातही ऊसतोड रोखत आक्रमक इरादा स्पष्ट केला आहे.  


आसुर्ले-पोर्ले येथील दत्त (दालमिया भारत शुगर) या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल 3 हजार 75 रुपये जाहीर करून गळीत हंगामास काल सुरुवात केली. मात्र, उचल मान्य नसल्याचे सांगत तालुक्यातील स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी कारखान्याची ऊस वाहतूक रोखली. कारखाना गेटसमोर ट्रॅक्टर येताच कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर परत पाठवले. पहिल्या उचलीबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणीही ऊस तोड घेऊ नये असे आवाहन संघटनेनं केलं आहे. 


जोपर्यंत स्वाभिमानी आणि दालमिया प्रशासन यांच्या एफआरपीबाबत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी तोडणी स्वीकारू नये, असे तालुका युवा अध्यक्ष विक्रम पाटील यांनी कारखानास्थळी बोलताना केले.


एकरकमी एफआरपी व जादा 350 रुपयांसाठी स्वाभिमानीचा आक्रमक पवित्रा


दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा सज्जड इशारा जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत दिला होता. या मागणीनंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील तिन्ही कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे.  


शिरोळ तालुक्यातील गुरुदत्त शुगर, घोडावत जॅगरी तसेच शिरगुप्पे शुगर कारखान्याची ऊस वाहतूक आतापर्यंत स्वाभिमानीने रोखली आहे. ऊस परिषदेत चालू गळीत हंगामात एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी, गतवर्षीच्या ऊसाची एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत, कारखान्यांचे वजनकाटे ऑनलाईन करा यासह 13 ठराव मंजूर करण्यात आले होते. 


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील साखर कारखान्यकडून चालू हंगामात पहिली उचल प्रतिटन ३ हजार रुपये दिली जाणार आहे. हसन मुश्रीफ यांनीही एकरकमी एफआरपी देण्याची घोषणा केली आहे. मात्र, राजू शेट्टी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून अन्य कारखानदार काय मार्ग काढणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या