मुंबई : सुरेश धस हे धनंजय मुंडे यांना साडेचार तास भेटले की साडेचार मिनिटे भेटले हा मुद्दा महत्त्वाचा नाही. मुद्दा महत्त्वाचा आहे की  या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसे शकतात? सुरेश धस बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहेत असं शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी म्हटलंय. मला संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांचे वाईट वाटतं ज्यांनी सुरेश धस यांच्यावर एवढा विश्वास टाकला असंही त्या म्हणाल्या. भाजपचे आमदार सुरेस धस आणि राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांची दोन वेळा भेट झाल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर सुषमा अंधारेंनी प्रतिक्रिया दिली. 


आमदार सुरेश धसांवर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, "सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेऊन बीडच्या जनतेचा विश्वास गमावला. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये कधी ते पोलिसांना माफ करा म्हणतात, कधी ते धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात. ही संभ्रमावस्था ते का निर्माण करतात? ते फक्त स्वतःचा विश्वास गमवत नाहीत तर ते देवेंद्र फडणवीस यांची विश्वासार्हता सुद्धा गमवत आहेत."


फडणवीसांची इमेज बाहुबली करायची होती


सुषमा अंधारे म्हणाल्या की,"सुरेश धस यांनी जो लढा उभा केला होता तो फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जिथे राष्ट्रवादी आहे तिथे भाजपचा शिरकाव करण्यासाठीच होता. धस यांची मराठा नेता म्हणून एस्टॅब्लिश करणे आणि देवेंद्र फडणवीस यांची इमेज बाहुबली प्रस्तावित करणे एवढेच काम त्यांना करायचं होतं. ते काम फत्ते झाल्यानंतर आता एकमेकांच्या गळ्यात गळे घातल्यानंतर काय फरक पडतो असं त्यांना वाटत असेल."


राज्यातील 18 पगड जातीने सुरेश धसांवर विश्वास दाखवला, तो विश्वास त्यांनी मातीमोल ठरवला असं सुषमा अंधारे म्हणाल्या. त्यामुळेच गंगाधर ही शक्तिमान है असं आम्हाला खेदाने म्हणावं लागतंय असंही त्या म्हणाल्या. 


सुरेश धसांनी घेतली धनंजय मुंडेंची भेट


अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात सुरेश धस यांची आक्रमकता गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रानं पाहिली. आकाचा आका म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंना जेरीस आणण्याचा प्रयत्न केल्याचंही महाराष्ट्रानं पाहिलं. पण याच आक्रमक सुरेश धस यांनी थेट धनंजय मुंडे यांचीच भेट घेऊन खळबळ उडवून दिली. एबीपी माझानं दिलेल्या या बातमीवर खुद्द सुरेश धस यांनीच शिक्कामोर्तब केलं. 


धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतल्याचं सुरेश धस यांनी मान्य केलं. मुंडेंवर डोळ्यांचं ऑपरेशन झाल्यानंतर धस त्यांना भेटायला गेले. तब्येतीची विचारपूस करण्यात काहीच गैर नसल्याचं धस यांचं म्हणणं आहे. पण मग त्यांनी केलेल्या आरोपांचं काय? दोघांमध्ये आता समेट झाला का, असे प्रश्न विचारले जात आहेत. 


 



ही बातमी वाचा: