अहमदनगर :  माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे निकटवर्तीय आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे यांच्या विरोधात निवडणूक लढवलेले काँग्रेस नेते सुरेश थोरात यांच्या विरोधात पिस्तूलाचा धाक दाखवून धमकी दिल्याचा गुन्हा संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. तर फिर्यादीच्या पत्रकार असलेल्या भावाने बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात सोशल मीडियात केलेल्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात सुरेश थोरात यांसह ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाल्याने घटनेतील सत्य मात्र पोलीस तपासात पुढे येईल.


संगमनेर तालुक्यातील जोर्वे हे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच मुळगाव असून भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विधानसभा मतदारसंघाला हे गाव जोडले गेल्यापासून विखे विरुद्ध थोरात हा संघर्ष कायम सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी स्वानंद चत्तर नावाच्या स्थानिक वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकाराने माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात पोस्ट केल्यावर काल रात्रीच्या सुमारास सुरेश थोरात यासह 60 जणांनी घरी येत आम्हाला धमकी दिल्याची फिर्याद पत्रकार स्वानंद चत्तर  याचा भाऊ विवेक चत्तर याने दिली. हातात कुऱ्हाडी घेऊन व डोक्याला बंदूक लावत आम्हाला धमकी दिली असून मी बाहेर असताना हा प्रकार सुरू असल्याने मी घरी आल्यावर हे सगळं घडलं अशी फिर्याद संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. 


दोन दिवसांपूर्वी बाळासाहेब थोरात यांच विधानसभेत लाईव्ह भाषण सुरू असताना संगमनेर तालुक्यातील पिंपरने येथील स्थानिक वृत्तपत्राच काम करणाऱ्या स्वानंद चत्तर याने माजी महसूलमंत्री थोरात यांच्या आक्षेपार्ह पोस्ट विरोधात तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर आमच्याकडे धमकीची सुद्धा तक्रार आली.  फिर्यादीच्या म्हणण्यानुसार गुन्हा दाखल केला असून वेगवेगळी पथक नेमून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती  संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी दिली आहे. 


 दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आरोपीचा शोध पोलीस घेत असून सुरेश थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा चुकीचा व खोटा गुन्हा दाखल केल्याचं सांगितलं असून राजकीय हेतूने आम्हाला अडकविण्याचा प्रयत्न केला जातोय.  सुरेश थोरात हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर सुद्धा शिर्डीच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यातच हा गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली असून या घटनेतील  पोलीस तपास पूर्ण झाल्यावरच पूर्ण सत्य बाहेर येईल