मुंबई : महाराष्ट्रात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यांवरून पुन्हा वातावरण पेटणार असं चित्र निर्माण झालंय. 9 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 10 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्र बंद ठेवणार अशी घोषणा सुरेश पाटील यांनी मराठा आरक्षण संघर्ष समितीच्यावतीनं देण्यात आली आहे. आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये संघर्ष समितीने पत्रकार परिषद पार पडली.


काही दिवसांपूर्वीच छत्रपती संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर अनेक मराठा संघटनांनी नाराजी व्यक्त केली होती. सुरेश पाटील यांनी ईडब्ल्यूएस (EWS) आरक्षण तात्काळ लागू करा, नोकरभरती बंद करा अशा मागण्या समोर ठेवत बंदचा इशारा दिला आहे. या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर कडकडीत बंद पाळला जाईल असा इशारा दिलाय.


लॉकडाऊनमध्ये बंद कशासाठी?


महाराष्ट्रात आधीच लॉकडाऊननं लोकाचं कंबरडं मोडलंय त्यात या बंदनं काय साध्य होणार? यावर पाटील यांनी “हा बंद म्हणजे मराठा समाजाच्या भावना आहेत” अशी प्रतिक्रिया दिली. याआधी आरक्षणासाठी मराठी क्रांती मोर्चाकडून जिल्हापातळीवर अनेक मुक मोर्चे काढण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही दिवसांत ठिकठिकाणी आंदोलनं सुरु झाली आहेत. सरकार आणि मराठा समाजाच्या नेत्यांमध्ये संवाद सुरु असताना बंद कशासाठी असा सवाल उपस्थित केला जातोय. कोरोनामुळे महाराष्ट्रात अनेकांना आर्थिक संकंटाला सामोरं जावं लागतंय त्यात अशा बंदनं काय सिद्ध होणार याबाबत संभ्रमच आहे.


इतर संघटना सामील होणार का?


मराठा आरक्षणासाठी विविध संघटना काम करत आहेत. आज या संघर्ष समितीकडून बंदची घोषणा करण्यात आली पण इतर संघटनांचं पाठबळ या संघटनेला नसल्याचं चित्र दिसून आलं. ज्यावेळेस बंद पुकारला जातो त्यावेळेस अनेक संघटना एकत्र येऊन किंवा त्याच्या समर्थनाचं पत्र घेऊन पुढे येतात पण यावेळी सुरेश पाटील हे एकटेच दिसले. इतर संघटनाबाबत प्रश्न विचारला तेव्हा सर्वांच्या हक्काची लढाई आहे सर्वांनी उत्स्फुर्तपणे पुढे यावं असं आवहान केलं पण या आवहानाला कितपत इतर संघटना साथ देतील याबाबत शंकाच आहे


राजेंचं नेतृत्व नको


मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती उदयनराजे यांनी आघाडी घेतली आहे पण या दोन्ही राजांनी या आरक्षणासाठी नेतृत्व करू नये असं मत सुरेश पाटील यांनी व्यक्त केलं. गेल्या काही दिवसांत या दोन्ही राजांच्या परस्परविरोधी व्यक्तव्यांनी मराठा समाजात संभ्रम निर्माण झाला होता त्यामुळे नेमकी कोणाची भूमिका समोर ठेवायची असा सवाल संघटनासमोर निर्माण झाला होता. मराठा समाजाचं नेतृत्व एका राजाकडे गेलं तर इतर समाजाचं पण नेतृत्व राजेंना करावं लागेल असं सुरेश पाटील यांनी मत व्यक्त केलं आहे. पण आता यावर राजे खास आपल्या शैलीत सुरेश पाटीलांचा कसा समाचार घेतायत हे देखील पाहावं लागेल.


संबंधित बातम्या :