मुंबई : महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर शरद पवार यांनी आपल्या मंत्र्यांना पक्ष कार्यालयात जनता दरबार घेण्याच्या सूचना दिल्या. तसे जनता दरबार देखील सुरू झाले पण त्याचवेळी सुप्रिया सुळे देखील आज पासून पक्ष कार्यकर्ते आणि लोकांना भेटण्यासाठी पक्ष कार्यालयात दर मंगळवारी उपलब्ध असणार आहेत. राष्ट्रवादी पक्षात अजून एक सत्ता केंद्र त्यांच्या रुपात असल्याचे दिसत आहे.


महाविकास आघाडी सरकार बनवण्यापासून ते सरकारचे कामकाज याबाबत एक व्यक्ती कायम सक्रिय दिसली त्या म्हणजे सुप्रिया सुळे. आघाडी सरकार असताना केंद्रीय राजकारणात सुप्रिया सुळे रमल्या होत्या. राज्यात युवती काँग्रेसच्या मेळाव्याच्या माध्यमातून सुप्रिया सुळे यांचा वावर होता. पण राज्यात महाविकास आघाडी सरकार आल्यावर मात्र सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रिय दिसत आहेत. सरकार बनवण्याच्या प्रक्रियेपासून ते पहिल्या अधिवेशनात त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांचे स्वागत केले. सरकार स्थापनेनंतर आपल्या मतदारसंघातील काम असो किंवा राज्यातील महत्वाच्या विषयांवर सुप्रिया सुळे मुख्यमंत्री ते विविध मंत्र्यांना थेट स्वतः भेटून प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात. अगदी केंद्र सरकारची राज्य सरकारला अडचणीत आणणाऱ्या मुद्द्यांवर सुप्रिया सुळे परखडपणे भूमिका मांडतात.


राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात सर्व मंत्र्यांचे जनता दरबार होतात पण सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून पक्षाचा एक नेता देखील आता जनतेसाठी कार्यालयात उपलब्ध असणार आहे. सुप्रिया सुळे आजपासून राष्ट्रवादी कार्यालयात दर मंगळवारी सकाळी अकरा ते दुपारी दोन पर्यंत लोकांना भेटण्यासाठी उपलब्ध असणार आहेत.


राष्ट्रवादी पक्षाचे काम असो किंवा आपल्या जिल्ह्यातील कोणतंही काम सामान्य जनता, आमदार ते अधिकारी एकतर शरद पवार,जयंत पाटील यांच्याकडे जातात नाहीतर अजित पवार यांच्याकडे पण आता सुप्रिया सुळे ही त्यांच्या बरोबरीने दिसत आहेत. अनेक आमदार देखील सुप्रिया सुळे यांच्याशी मतदारसंघातील विविध समस्या,प्रश्न याबाबत चर्चा करतात. पक्षात सुप्रिया सुळे यांची वाढती सक्रियता हा म्हणूनच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.