Supriya Sule :  परीक्षांमध्ये होणाऱ्या घोटाळ्याच्या (exam scam) मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आक्रमक झाल्या आहेत. एमएमआरडीए भरती प्रक्रियेतील गैरप्रकाराच्या मुद्यावरुन त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये परिक्षांमध्ये सातत्याने गैरप्रकार होत असल्याचे समोर आले आहे. आता एमएमआरडीए भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा सरकारी परीक्षांच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या. या परीक्षेत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून, त्यांची सखोल चौकशी होणं अतिशय गरजेचं असल्याचेही सुळे म्हणाल्या. 

Continues below advertisement

Supriya Sule : नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारी लाखो मुले, त्यांचे पालक आणि त्यांचे स्वप्न या सर्वांच्या कष्टांचे मोल सरकारने राखायला हवे. माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नम्र विनंती आहे की, ही प्रक्रिया तातडीने रद्द करुन मा. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या परीक्षेतील गैरप्रकाराची चौकशी करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुळे यांनी केली आहे. हा विषय फक्त एका परीक्षेचा नाहीये, मागील 1 वर्षात BMC SE ,BMC JE, PMC JE, Mahatransco AE MJP JE, MMRDA JE, MIDC AE, MIDC JE, CIDCO AE अशा 8 ते 9 परीक्षेमध्ये घोटाळे झाल्याचे समोर आल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

 गैरप्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार, पण तपास बंद करण्यात आल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप

विद्यार्थ्यांनी PMC परीक्षेमध्ये झालेल्या गैरप्रकाराबद्दल शिवाजीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती, त्याचा तपास बंद करण्यात आल्याचे विद्यार्थांचे म्हणणे आहे. तसेच महा ट्रान्स्को AE परीक्षेत काही संशयित विद्यार्थी आढळून आले होते याबद्दल ही चौकशी होणे गरजेचं असल्याचे मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे. 

Continues below advertisement

परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागल्याचं चित्र

अलिकडच्या काही वर्षांमध्ये सातत्याने  पेरफुटीचे प्रकार घडल्याचे समोर येत आहे. या काळात परिक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागल्याचं चित्र दिसत आहे. सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही असा आरोप केला जात आहे. नीट, टीईटी पेपरफुटीनंतर आता एमएमआरडीएच्या अभियांत्रिकी भरती परीक्षेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप देखील होत आहे. याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे या आक्रमक झाल्या आहेत. याबाबत चौकशी करण्यात यावी असी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.