मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोकसभेतील आठपैकी सात खासदारांशी संपर्क साधून अजित पवारांसोबत येण्याची ऑफर सुनील तटकरेंनी दिल्याच्या बातम्या आल्यानंतर त्यावर आता स्वतः तटकरेंनीच प्रतिक्रिया दिली आहे.  आमच्याकडून तसा कोणताही प्रयत्न केला गेला नाही, कुणालाही फोन गेला नाही असं स्पष्टीकरण खासदार सुनील तटकरे यांनी दिलं. तसेच सोनिया दुहान या राष्ट्रवादीच्या नेत्या नाहीत, त्यामुळे त्यांनी काय केलं यावर बोलणार नाही अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली. 


शरद पवार गटाच्या लोकसभेतील आठपैकी सात खासदारांशी सुनील तटकरेंनी संपर्क साधल्याच्या बातम्या येत आहेत. तसेच सोनिया दुहान यांनीही या खासदारांशी संपर्क साधून विकासकामांसाठी एनडीएसोबत येण्याचं आवाहन केल्याचा दावा खासदार अमर काळे यांनी केला आहे. या सर्व गोष्टी खासदार सुनील तटकरे यांनी नाकारल्या आहेत. 


दिल्लीत अनेक खासदार भेटतात


सुनील तटकरे म्हणाले की, "विधानसभेतील पराभवानंतर त्यांची जागा काय आहे ते दिसून आलं. मी गेली 40 वर्षे राजकारणात आहे. त्यामध्ये कधीही बाप-लेक असा शब्दप्रयोग नाही. मी कुणाशीही संपर्क केला नाही. दिल्लीत अनेक कार्यक्रमात खासदार भेटतात. त्यावेळी काही चर्चा होते. पण अशा प्रकारचा संपर्क केलेला नाही. आमच्याकडून कुणालाही फोन गेला नाही."


कुणी कुठे भेटलं हे योग्य वेळी सांगेन 


केवळ चर्चेत राहण्यासाठी केला गेलेला हा प्रयत्न आहे असा आरोप सुनील तटकरे यांनी केला. सोनिया दुहान या काही आमच्या पक्षात नाहीत. त्यांना आमच्याकडून कोणतेही अधिकार दिलेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले. 


सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये काय चर्चा झाली याबद्दल मला काही माहिती नाही. पण कुणी, कुठे, काय बोललंय याची माहिती मी योग्य वेळी देईन. 2014 पासून 2024 पर्यंत राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्यासाठी काय प्रयत्न केले गेले हे योग्य वेळी सांगेन असंही सुनील तटकरे म्हणाले. 


शरद पवारांचे खासदार फोडण्याचे प्रयत्न? 


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांना फोडण्याचा प्रयत्न अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून केले जात असल्याची माहिती आहे. याची जबाबदारी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर सोपवण्यात आली होती अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या सात खासदारांची भेट घेत त्यांना सोबत येण्याची ऑफरही देण्यात आली. सुप्रिया सुळे वगळता उर्वरित खासदारांना सोबत येण्याची ऑफर देण्याची आल्याची माहिती आहे. मात्र संपर्क झालेल्या सातही खासदारांनी तटकरेंची ही ऑफर धुडकावली असा दावा केला जातोय. 


सुप्रिया सुळेंची नाराजी


हा सगळा प्रकार समजल्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी प्रफुल पटेलांना फोन करत तटकरेंबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. दरम्यान, असे संपर्क झाले होते का याबाबत चर्चांना उधाण आल्यावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक खासदारच असा संपर्क झाल्याचा जाहीर गौप्यस्फोट करत आहेत. मात्र सर्वच खासदारांनी अजित पवारांसोबत जाण्यास नकार दिलाय.


सोनिया दुहान संपर्क साधत असल्याचा दावा 


दुसरीकडे खासदार अमर काळे यांनी तटकरे संपर्क करत नसून सोनिया दुहान या संपर्क करत होत्या अशी माहिती दिली. विकासकामं करून घ्यायची असतील तर एनडीएसह जावं लागेल असं सोनिया दुहान यांनी म्हटल्याचा गौप्यस्फोट अमर काळेंनी केलाय.  


खासदार अमर काळे काय म्हणाले?


खासदार अमर काळे यांनी एबीपी माझाला माहिती देताना सांगितलं की, काँग्रेसच्या सोनिया दुहान आमच्यासोबत संपर्क साधत होत्या आणि त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत चला असा आग्रह केला होता. जर विकास कामे करायची असतील तर तुम्हाला एनडीएमध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असं ही त्या म्हणाल्या होत्या. केवळ अमर काळेच नाही तर निलेश लंके, भगरे गुरुजी, धैर्यशील मोहिते पाटील, बजरंग बप्पा या सर्वांशी त्यांनी संपर्क साधला होता. सुनील तटकरे यांनी कधीही आमच्याशी संपर्क साधला नाही. सोनिया दुहान संपर्क करत होत्या. शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडे याबाबत आम्ही तक्रार केली आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.


ही बातमी वाचा :