बीड : पार्थ पवारांना निवडणुकीत पाडलं, आता रोहित पवारांनाही पराभूत करु, सुजय विखेंच्या नावाने असे अनेक मेसेज सोशल मीडियात वायरल होत असतात. मात्र यावर स्पष्टीकरण देत एबीपी माझाकडे रोहित पवारांसोबतच्या मैत्रीवरही सुजय विखेंनी भाष्य केलं आहे. कर्जतमधील कार्यक्रमात मी पवार कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात एक शब्दही बोललो नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या छापल्याचा दावा आज सुजय विखे यांनी परळीत एबीपी माझाशी बोलताना केला आहे.


रोहित पवारांशी माझे चांगले मैत्रीचे संबंध आहेत. आम्ही चांगले मित्र आहोत, असं म्हणत मैत्री आणि राजकारण कधी एकत्र करणार नसल्याचं भाजप खासदार सुजय विखेंनी स्पष्ट केलं आहे. विधानसभेसाठी रोहित पवार कर्जतमधून निवडणूक लढवणार आहेत का नाही, मला माहीत नाही, पण भाजपाचा खासदार म्हणून  मी भाजपाचा प्रामाणिकपणे प्रचार करणार असल्याचं सुजय विखेंनी सांगितलं आहे.



रोहित पवारांनी माझ्या विरोधात प्रचार केला, त्याप्रमाणेच गरज पडल्यास मीही त्यांच्या विरोधात प्रचार करेन असं वक्तव्य सुजय विखेंनी केलं आहे.  मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळं आहे असंही यावेळी सुजय विखे म्हणाले.

म्हणून पार्थ पवारांचा पराभव..

राजकारणात जय-पराजय होत असतो. पार्थने चांगली मेहनत घेतली पण त्यांचा पराभव झाला. कदाचित माझाही पराभव होऊ शकला असता, असं म्हणत पार्थ पवारांच्या पराभवाविषयी जास्त बोलणं टाळलं. आता निवडणूक संपली आहे आम्ही वैयक्तिक कुणावरही आरोप करणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

सुजय विखे पाटील-रोहित पवार एकत्र, राजकीय वैर संपवून तिसऱ्या पिढीकडून मैत्रीचा नवा अध्याय?