मुंबई : देशभरात साखरेचे (Suger) वाढलेले भाव सर्वसामान्यांच्या किचनचं बजेट कोलमडणारं आणि सणाच्या गोडव्यात कडवटपणा निर्माण करणारे बनले आहेत. महिनाभरातच साखरेच्या भावात तब्बल 30 रुपयांपेक्षा अधिक दरवाढ झाल्याने साखरेचे दर 70 रुपयांच्या पुढे गेले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणात साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, व्यापाऱ्यांकडून साठेबाजीला आळा घालण्यासाठी काही कठोर पाऊले उचलण्यात येत आहेत. अन्न व पुरवठा विभागाने आदेश जारी करत, 4000 क्विंटलपेक्षा अधिकच्या साखरेचा साठा न करण्याचे निर्देश दिले आहेत, अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
केंद्र शासनाने अत्यावश्यक वस्तू अधिनियम, 1955 च्या कलम 3 तसेच साखर (नियंत्रण) आदेश, 2025 मधील खंड 7 व खंड 16 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून साखरेच्या साठा मर्यादेबाबत 28 जुलै 2026 रोजी अधिसूचना निर्गमित केली आहे. सदर साखर साठ्यावरील निर्बंधाचा आदेश 30 नोव्हेंबर, 2026 पर्यंत लागू राहील असे नमूद केले आहे. या आदेशप्रमाणे 4000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा करता येणार नाही.
साखरेच्या साठ्यासंदर्भाने शासनाचे निर्देश
१. कोणताही साखर विक्रेता साखरेचा साठा प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत धारण करू शकणार नाही. तसेच कोणत्याही वेळी व कोणत्याही ठिकाणी 4,000 क्विंटलपेक्षा अधिक साखरेचा साठा ठेवता येणार नाही. सदर निर्बंध शासनाच्या खात्यावरील साठ्यास तसेच राज्य शासनाने नामनिर्देशित केलेल्या विक्रेत्यांमार्फत सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत रास्त भाव दुकानांमध्ये वितरणासाठी ठेवण्यात आलेल्या साठ्यास लागू राहणार नाहीत. तसेच, सर्व साखर विक्रेत्यांनी अन्न व सार्वजनिक वितरण विभागाच्या https://foodstock.dfpd.gov.in/ या पोर्टलवर साखरेच्या साठ्याची माहिती घोषित करून ती नियमितपणे अद्ययावत ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न व पुरवठा विभागाकडून सदर अधिसूचना 1 ऑगस्ट 2026 पासून लागू होऊन 30 नोव्हेंबर पर्यंत अंमलात राहणार आहे. सदर आदेशाची सक्त अंमलबजावणी करण्यात यावी आमि साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, असे निर्देशही पुरवठा विभागाने दिले आहेत.
सोलापुरात पुरवठा विभागाच्या धाडी
दरम्यान, देशभरात साखरेच्या दरात वाढ झाल्यानंतर सोलापुरात साखरेच्या साठेबाजीविरोधात प्रशासन सतर्क झाले असून सोलापूर जिल्हा पुरवठा विभागाकडून साखर विक्रेत्यांच्या ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये आणि साठेबाजीला आळा बसावा यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने विशेष तपासणी पथकं नियुक्त केली आहेत. या पथकांकडून मोठ्या प्रमाणात साखरेची विक्री होणाऱ्या व्यवसायांच्या ठिकाणी धाड टाकून साठ्याची तपासणी केली जात आहे. दरम्यान, साखर विक्रेत्यांनी 15 दिवसांपेक्षा अधिकचा साठा करू नये, अशा स्पष्ट सूचना जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.
