Sudhir Mungantiwar Birthday : अखंड भारताचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाला फाडताना वापरलेली वाघनखं अनेक वर्षे लंडनमधल्या म्युजिअमध्ये अडकलेली. पण ती आणतो असं एका नेत्याने जाहीर केलं आणि अनेक अडचणींवर मात करत ती वाघनखं भारतात परत आणली. भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही अशक्य वाटणारी किमया केली. 30 जुलै रोजी सुधीर मुनगंटीवारांचा वाढदिवस, त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीचा घेतलेला हा विशेष आढावा.


आपल्या कुशल संघटन कौशल्याने आणि सामाजिक बांधिलकीला प्राधान्य देणारे, दिलेला शब्द कोणत्याही परिस्थितीत पाळणारे नेते अशी सुधीर मुनगंटीवारांची ओळख. कुणावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या मदतीला धावून जाणारे सुधीरभाऊ हे सर्वसामान्यांचे नेते. राजकीय नेत्यांकडे विविध समस्या आणि कामे घेऊन येणाऱ्यांची रीघ असते. या वर्दळीत प्रत्येकाला भेटणे त्यांची समस्या सोडविणे हेच नव्हे तर ती व्यक्ती परत भेटण्यासाठी आली तर त्याला नावाने हाक मारून त्याची आस्थेने विचारपूस करणारे नेते अशी ओळख सुधीर मुनगंटीवार यांची ओळख. 


महाविद्यालयात एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय विद्यार्थ्याने छात्रसंघाची निवडणूक लढवली... नंतर त्याने मागे वळून पाहिलंच नाही. छात्रसंघाचे सरचिटणीस ते राज्याचे अर्थमंत्रीपद आणि सध्या सांस्कृतिक मंत्री असा सुधीर मुनगंटीवारांचा राजकीय प्रवास सर्वांनाच अचंबित करणारा आहे. आयुष्यात अनेक वादळांना यशस्वी तोंड देणारे आणि कोणत्याही परिस्थितीत हार न मानणाऱ्या सुधीर मुनगंटीवारांची राजकीय कारकिर्द नेमकी कशी आहे यावर एक नजर मारू, 


समाजकारणासाठी राजकारणाचा मार्ग


सुधीर मुनगंटीवार यांचा जन्म 30 जुलै 1962 रोजी विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात झाला. लहानपणापासूनच मुनगंटीवारांचा कल हा सामाजिक कार्याकडे. त्यामाध्यमातून त्यांनी युवकांचे संघटन करून समाजासाठी काहीतरी वेगळं करण्याची जिद्द बाळगली. समाजकारण करायचा असेल तर त्याला राजकारणाचा पाया असावा हे त्यांनी महाविद्यालयामध्येच जाणलं. आजूबाजूच्या लोकांच्या जीवनात काहीतरी सकारात्मक बदल घडवायचा असेल,  समाजकार्याचा, विकासाचा डोंगर उभा करायचा असेल तर सक्रिय राजकारणाशिवाय पर्याय नाही हे त्यांना समजलं. त्यातूनच त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढवली आणि राजकीय जीवनावाच श्रीगणेशा केला. 


सरदार पटेल महाविद्यालयाच्या छात्रसंघाची निवडणूक जिंकून सुधीर मुनगंटीवार सरचिटणीसपदी निवडून आले. त्यानंतर 1981 साली ते चंद्रपूर शहर भाजपाचे चिटणीस झाले. सुधीर मुनगंटीवार यांनी एम.कॉम., एल.एल.बी., एम.फिल., डी.बी.एम., बी.जे. इत्यादी पदव्या संपादन केल्या आहेत. 


पहिल्यांदा आमदार झाले अन् मागे पाहिलंच नाही


सुधीर मुनगंटीवार यांनी वयाच्या 33 व्या वर्षी म्हणजे 1995 साली चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली. पहिलीच निवडणूक त्यांनी दणक्यात जिंकली आणि नंतर मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर या मतदारसंघातून ते तब्बल सहावेळा निवडून आले. 


1995 सालच्या युतीच्या सरकारमध्ये त्यांना पर्यटन आणि ग्राहक संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी मिळाली. पहिल्याच आमदारकीच्या काळात, 1998 साली त्यांना उत्कृष्ट संसदपटू म्हणूनही गौरवण्यात आलं होतं. त्याचसोबत समाजातील अंध-अपंग व्यक्तींच्या मदतीसाठी वैधानिक लढा देणाऱ्यास दिला जाणारा जी.एल.नार्देकर स्मृती पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आलं. 


भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी


चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या उभारणीमध्ये सुधीर मुनगंटीवारांचा मोठा वाटा आहे. मुनगंटीवारांचे राजकीय कौशल्य पाहून 2009 साली त्यांना भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची संधी मिळाली. 2013 पर्यंत त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजपमध्ये मोठे बदल करण्यात आले आणि त्याचा परिणाम पुढच्याच वर्षी म्हणजे 2014 साली दिसून आला. त्यावेळी भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आणि पहिल्यांदाचा भाजपचा मुख्यमंत्री राज्याला लाभला. 


गरिबांसाठी अनेक कार्यक्रम


राजकारण करतान मुनगंटीवारांनी कधीही समाजकारणाकडे दुर्लक्ष केलं नाही. गोरगरिबांना मदतीचा हात देता यावा म्हणून त्यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून चंद्रपूरमध्ये वाचनालय आणि माहिती व मार्गदर्शन केंद्र सुरू केलं. संस्थेच्या माध्यमातून अपंगांसाठी मार्गदर्शन मेळावे, बचतगट महिलांसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले. याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घूस, मुल, चिचपल्ली, धाबा येथील नागरिकांसाठी रुग्णवाहिका सुरू केल्या. रुग्णांना मोफत चष्मे वाटप, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आदी उपक्रमही त्यांनी राबविले.


प्रतिज्ञा केली आणि पूर्णत्वास नेली


आपल्या पहिल्या आमदारकीच्या काळात म्हणजे 1995 मध्ये मुनगंटीवारांनी 'जर आमदारकीच्या कार्यकाळात बल्लारपूर तालुक्याची निर्मिती करू शकलो नाही, तर पुन्हा निवडणूक लढणार नाही' अशी प्रतिज्ञा केली होती. त्यानंतर त्यांनी बल्लारपूर तालुका होण्यासाठी अथक प्रयत्न केले आणि अखेरीस 1999मध्ये बल्लारपूर तालुक्याची निर्मिती झाली.


क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोगाची स्थापना


मुनगंटीवारांच्या प्रयत्नानंतर राज्यात क्रांतिवीर लहुजी साळवे मातंग आयोग स्थापन झाला. तसेच स्वतंत्र खनिज विकास मंत्रालयाची निर्मितीही त्याच्या प्रयत्नांना आलेलं यश आहे. चंद्रपूर, गडचिरोली या दोन जिल्ह्यांसाठी स्वतंत्र गोंडवाना विद्यापीठ स्थापन करण्यासाठीही त्यांनी सातत्याने संघर्ष केला. त्यामुळे अखेरीस या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली.


विदर्भातील महत्त्वाचा चेहरा


सुधीर मुनगंटीवार यांनी आमदारकीसोबतच पक्षातील विविध महत्वाच्या पदांवर कार्य केले आहे. त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं आहे.  भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे नेते म्हणून मुनगंटीवारांची ओळख आहे.