संगमनेर (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरातील आदिवासी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून विद्यार्थ्यांचं अन्नत्याग आंदोलन सुरु आहे. ठेकेदार निकृष्ट दर्जांचं जेवण देत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांची आहे. ठेकेदारावर ठोस कारवाई झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. नाशिकचे विभागीय अप्पर आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना लेखी पत्र देऊन कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. मात्र विद्यार्थ्यांनी पत्र घेण्यास नकार दिला आणि विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.


संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील शासकीय आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. निकृष्ट अन्न मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरु केलंय. या वस्तीगृहातील सुमारे 250 मुलं अन्नत्याग आंदोलनात सहभागी झाले आहेत. राजूर येथील प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे हे देखील मुलांशी चर्चा करण्यासाठी वसतीगृहात आले होते. मात्र मुलांनी त्यांच्यासोबत चर्चा करण्यास नकार दिला होता. संतप्त विद्यार्थ्यांनी वस्तीगृहातील गेटलाच टाळं ठोकलं होतं.


दरम्यान नाशिक आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त गिरीश सरोदे, आमदार सुधीर तांबे यांनी विद्यार्थ्यांसोबत बैठक घेतली. परंतु त्या बैठकीतही ठोस आश्वासन न मिळाल्याने विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. तर अकोलेचे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी आंदोलनास पाठिंबा दर्शवत ठेकेदार पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे.


आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आवाज तिसरा दिवस आहे. अद्यापही तोडगा निघत नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. आज मागण्या मान्य झाल्या नाही, तर अन्नत्याग आंदोलना बरोबर रस्त्यावर उतरुन आंदोलन तीव्र करण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.