Solapur : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील टेंभुर्णीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.  टेंभुर्णी येथील रयत शिक्षण संस्थेत (Rayat Shikshan Sanstha) शिकणाऱ्या इयत्ता 10 वी मधील विद्यार्थ्यांचा मधल्या सुट्टीत दुसऱ्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. करमाळा तालुक्यातील कंदर येथील रहिवासी असणारा 16 वर्षाचा स्वप्नील मन्नत शिंदे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.  

टेंभुर्णी येथील शुक्रवार पेठेत रयत शिक्षण संस्था असून दुपारी 2 वाजता जेवणाची सुट्टी झाली होती. शाळेचा दुसऱ्या मजल्यावर 10 वीचा वर्ग आहे. दुपारी तीन वाजण्याचा सुमारास सुट्टी संपत आल्याने विद्यार्थी आपापल्या वर्गात परतत होते. त्यावेळी स्वप्नील हा खाली कोसळला असल्याचे शिक्षकांना समजल्याने त्यांनी तात्काळ त्यास येथील खासगी मार्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. 

शिवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार

स्वप्नील हा 10 वीत असल्याने दररोज मित्रांबरोबर सकाळी सहा वाजता टेंभुर्णी येथे शिक्षण घेण्यासाठी येत होता. तो आई वडिलांना एकुलता एक असून त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरु केला असून शिवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे. दरम्यान या घटनेच्या वेळी शाळेत घटनास्थळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकां कडून पोलीस माहिती घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

हेडफोन घालून रुळ ओलांडताना महिलेचा मृत्यू, वाचवायला गेलेला युवकही ठार; आई-वडिलांचा आधार गेला