CPI(M) : सौर ऊर्जा पॅनल बसवण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी खासगी कंपन्यांना गावानजीकची गायराने अत्यल्प मोबदल्यात बहाल केली जात आहेत. राज्यभर अनेक ठिकाणी ही गायराने दलित समाजाच्या ताब्यात आहेत. अत्यंत गरीब अवस्थेत जीवन जगणाऱ्या दलित समाजाच्या कुड, पाचट, पत्राच्या गायरानातील घरांवर बुलडोझर फिरवले जात आहेत. पोलीस बळाचा वापर करून ताबा असलेल्या दलित कुटुंबांना गायरानांवरून हुसकावले जात असल्याचे मत  मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने व्यक्त केले आहे. दलितांना गायरानांवरून बेदखल करणे तातडीने थांबवा, अशी भूमिका माकपने घेतली आहे.  

पोलीस संरक्षणामध्ये दलित कुटुंबांच्या घरांवर जेसीपी 

बीड जिल्ह्यातील घाटनांदूर, उजणी, बर्दापुर, बाभळगाव, जवळगाव, उंदरी, उमराई, केंद्रेवाडी, कोळपिंपरी गावांमध्ये अशा प्रकारची कारवाई खासगी सौर ऊर्जा कंपन्यांच्या भल्यासाठी पोलिसांच्या मदतीने व सरकारच्या पाठिंब्याने करण्यात आली आहे. पोलिसांच्या या अमानुष कारवाईचा प्रतिकार करण्यासाठी बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई जवळील जवळगाव येथे दलित कुटुंबांनी आंदोलन सुरू केले. आपल्या पाचट, पत्रा, कुडाच्या झोपड्या वाचवण्यासाठी व कसत असलेली जमीन वाचावी यासाठी गेले सलग दीड महिना धरणे आंदोलन केले. हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पोलीस संरक्षणामध्ये दलित कुटुंबांच्या घरांवर जेसीपी चालवत अमानुष अत्याचार केला. आपला प्रतिकार मोडून काढला जात आहे हे लक्षात घेत हतबल होऊन यातील तीन आंदोलकांनी विष प्राशन केले. हे तीन आंदोलक अत्यावस्थ असून आंबेजोगाई येथील हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत. 

माकपचा आंदोलकांना पाठिंबा 

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने याबाबत संबंधित तहसीलदार व प्रांत अधिकारी यांची भेट घेतली आहे. अशा कारवाईबाबत आपल्याला काहीच माहीत नसल्याचे धक्कादायक विधान त्यांनी केले आहे. तहसीलदार व प्रांत अधिकारी यांना माहीत नसताना  दलितांविरुद्ध वापरण्यासाठी पोलीस संरक्षण कोणी दिले हा रास्त सवाल या निमित्ताने मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने उपस्थित केला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने राज्य कमिटी सदस्य बब्रुवाहन पोटभरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला असून विष प्राशन केलेल्या आंदोलकांना भेटून धीर दिला आहे. 

कोट्यवधी रुपयांच्या गायरान जमिनीची मालमत्ता खासगी कंपन्यांच्या घशात घालणे थांबवा 

सौर ऊर्जा पॅनल उभारणीच्या निमित्ताने राज्यभरातील कोट्यवधी रुपयांच्या गायरान जमिनीची मालमत्ता खासगी कंपन्यांच्या घशात घालणे तातडीने थांबवा. कसत असलेल्या गायरान जमिनी कसणाऱ्यांच्या नावे करा. गायरानात घर बांधलेल्या घरांच्या तळजमिनी घर बांधणाऱ्यांच्या नावे करा. बीड जिल्ह्यात गरीब श्रमिकांना गायरानांवरून बेदखल करणाऱ्या कंपनीवर व त्यांना पोलीस संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष करत आहे.