यवतमाळ : मुख्यमंत्र्यांच्या यवतमाळच्या दौऱ्यात आज मानापमान नाट्य पाहायला मिळालं. शिवसेना मंत्री संजय राठोड यांना मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं निमंत्रण दिलं गेलं नसल्यानं त्यांनी उघड नाराजी व्यक्त केली. तसेच, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून जाणीवपूर्व दूर ठेवल्याचा आरोप राठोड यांनी केला आहे.

कीटकनाशक फवारणीत 22 शेतकऱ्यांचा मृत्यूनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज यवतमाळला भेट दिली. यावेळी त्यांनी कीटकनाशक फवारणीत विषबाधा झालेल्या 700 शेतकऱ्यांची जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.

मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त प्रशासनाच्या वतीनं महसूल शिवसेनेचे आमदार आणि राज्याचे राज्यमंत्री संजय राठोड यांना निमंत्रण देण्यात आलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपल्याला जाणीवपूर्वक मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापासून दूर ठेवल्याचा आरोप करत, उघड नाराजी व्यक्त केली.

तसेच, यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे विचारणा करणार असल्याचं राठोड यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. शिवाय, या सर्वप्रकाराची माहिती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

दरम्यान, शेतकऱ्यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी प्रतिबंदीत असलेली कीटकनाशकं कुणाकडे सापडत असतील, तर अशी व्यक्ती आणि कंपन्यांवर कलम 307 आणि संघटित गुन्हेगारीसारखे गुन्हे दाखल करा, असे आदेश दिले आहेत.

संबंधित बातम्या

विषारी फवारणीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीसाठी मुख्यमंत्री यवतमाळला