मुंबई : राज्य सरकारने दोन वर्ष पूर्ण केल्यानिमित्त बनवलेल्या जाहिरातीवर आचारसंहितेमुळे निर्बंध येणार आहेत. त्यामुळे सरकारने कोट्यवधींचा निधी खर्चून जाहिराती करण्याचं नियोजन धुळीस मिळणार आहे.
2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर राज्य सरकारने विविध योजना सुरु केल्या होत्या. तसंच मागच्यावर्षी दुष्काळामुळे सरकारला पहिली वर्षपूर्ती करता आली नव्हती. यावर्षीही नगरपालिका निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे जाहिरातींवर निर्बंध येणार आहेत.
सत्तेत येऊन दोन वर्ष झाल्यानिमित्त सरकारने वृत्तपत्र, टीव्ही, होर्डिंग्स आणि सोशल मीडियावर जाहिरात करण्यासाठी कोट्यवधींची तरतूद केली होती. यावर्षी चांगला पाऊस झाल्याने सरकारने आपली कामं लोकांसमोर आणण्याची जोरदार तयारी चालवली होती. तसंच प्रत्येक विभागातील महत्त्वाचे पाच निर्णय आणि त्यांचा जनतेला झालेला फायदा यांची जाहिरात करण्याचा विचारही सरकारने चालवला होता.
सोशल मीडियावर मुख्यमंत्री स्वत: विभागानुसार केलेली कामही ट्विट करत होते. पण आगामी नगरपालिका निवडणूकांच्या आचारसंहितेमुळे सरकारला कोणत्याही जाहिराती दाखवता येणार नाहीत. सरकारकडून एसटी, बेस्ट बसेस, रेडिओ तसंच टीव्हीवरुनही जाहिरातीसाठी काही जाहिराती आणि व्हिडीओ बनवण्यात आले होते.