मुंबई : "ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे, शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी. आम्ही योग्य काम केलं आहे. आता नवीन सरकारने योग्य काम करावं, आम्हाला खात्री आहे की आरक्षणासह निवडणुका होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. "
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर ओबीसी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून ओबीसींची लढाई लढतो आहोत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण लागलं आहे. या प्रश्नावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.
"ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी बांठीया आयोग नेमला असून त्यांनी चांगलं काम सुरू केलं आहे. मध्य प्रदेश प्रमाणे डेटा गोळा करून घ्या म्हणून सांगितलं आहे. आम्ही मतदार यादीवरून डेटा गोळा केला. हा डेटा बांठीया कमिशनला आठ दिवसांपूर्वी दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जास्त जबाबदारी आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, भाजच्या अनेक नेत्यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर सरकारमध्ये बसून काय झोपा काढता काय असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, ही आठवण करून देत आता छगन भुजबळ यांनी या सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा असे म्हटले आहे.
काय म्हणाले होते बावनकुळे?
"ओबीसी समाजाच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार टाइमपास करत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातोय, हे राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी कबूल केले. असे असेल तर मग तुम्ही सरकारमध्ये बसून काय करत आहात? तुम्ही झोपा काढत आहात का?, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला विचारला होता.