मुंबई : केंद्र शासनाच्या निकषांवर राज्यात दुष्काळबाबत आढावा घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तीन टप्प्यात हा आढावा घेतला जाणार असून, दुष्काळ जाहीर करण्याबाबत 31 ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जाईल. आज याबाबत महसूल आणि कृषी विभागाची मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक पार पडली.
दुष्काळाबाबत तीन महत्त्वाचे निकष केंद्राने निश्चित केले असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील आढावा घेण्याचे काम पूर्ण झालं आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील आढावा घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरु असून तो पुढील आठवड्यात पूर्ण होणार आहे. तर तिसऱ्या टप्प्याचे काम 31 ऑक्टोबरपर्यंत पुर्ण होईल. या आढाव्यानंतर राज्यात किती जिल्ह्यात आणि तालुक्यात दुष्काळ आहे हे जाहीर केलं जाणार आहे.
विशेष म्हणजे, दुष्काळाच्या परिस्थितीच्या विश्लेषणासाठी 'महामदत' नावाचे एक अॅप आज लाँच करण्यात आलं. या माध्यमातून राज्य सरकार जिल्हाधिकर्यांमार्फत माहिती केंद्राकडे पोहचवली जाणार.
राज्यातल्या अनेक ठिकाणी कमी पाऊस पडल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यामुळे सरकारी सर्वेक्षणानंतर मदत मिळण्याच्या आशेवर बळीराजा आहे.