नागपूर : देसाईगंज नगरपरिषदेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर दबाव आणल्याप्रकरणी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांना राज्य निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झालेलं वृत्त आणि काँग्रेसने दाखल केलेल्या तक्रारीनंतर नोटीस बजावण्यात आली आहे.

नोटीस मिळाल्यापासून 24 तासांच्या आत खुलासा देण्याचे आदेश जानकरांना देण्यात आले आहेत. तसेच खुलासा प्राप्त न झाल्यास उपलब्ध पुराव्यांच्या आधारावर योग्य ती कारवाही करण्यात येईल, असंही नोटीसमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

महादेव जानकर यांचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जानकर प्रशाकीय अधिकाऱ्याला विरोधकांचे अर्ज बाद करण्याचा सल्ला देत आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील वडसा नगरपालिकेसाठी येत्या टप्प्यात निवडणूक होणार आहे. याठिकाणी आपण पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला कपबशी हेच चिन्ह द्या, अशी मागणी महादेव जानकर यांनी संबंधित अधिकाऱ्याकडे केली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा अर्ज आल्यास तो बाद करा, असंही जानकर बोलल्याचं या व्हिडीओमध्ये दिसतं आहे. त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान मी फक्त विनंती केली, आचारसंहिता भंग केली नाही, असं म्हणत महादेव जानकर यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. मात्र निवडणूक आयोगाच्या नोटीसला जानकर काय उत्तर देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

पाहा व्हिडिओ :


संबंधित बातम्या :


काँग्रेसचा अर्ज बाद करायचा, महादेव जानकरांचा व्हिडीओ व्हायरल