एसटी कर्मचाऱ्यांचे 5 हजार 600 कोटी रुपये थकले, संपाबाबतचा निर्णय अजित पवारांच्या कोर्टात, तोडगा निघणार का?
एसटी संपाबाबतचा निर्णय आता अर्थमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे.
ST strike Ajit Pawar News : एसटी संपाबाबतचा निर्णय आता अर्थमंत्री अजित पवार यांच्या कोर्टात गेला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जवळपास 5 हजार 600 कोटी रुपयांची देणी थकली आहेत. अशातच आर्थिक अडचणी दूर करण्यासंदर्भात अर्थमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा होणार आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनांकडून दिवाळीच्या तोंडावर संपाचा इशारा
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांच्या तीन संघटनांकडून दिवाळीच्या तोंडावर संपाचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी बैठकीत तोडगा न निघाल्यास एसटी कर्मचारी संघटना संपावर ठाम आहे. एसटीच्या कर्मचारी संघटनांकडून थकीत देणी देण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव, दर महिन्याला एसटीला 120 कोटी रुपये वाढीव दिल्यास तोडगा निघण्याची शक्यता आहे. अशात, अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुदतीपूर्वी प्रश्न सुटले नाहीत तर कर्मचारी आंदोलन तीव्र होईल
महागाई भत्ता फरक, वेतनवाढ फरक रक्कम, दिवाळी भेट रक्कम, सण उचल आदी मागण्यांचे फलक आणि पेटती मशाल हातात घेऊन राज्यातील 500 पेक्षा जास्त एसटीतील कामगार प्रतिनिधींनी 13 ऑक्टोबर पासून होणाऱ्या आंदोलनाची झलक दाखवण्यास सुरुवात केली आहे. या टीझरचे सादरीकरण करताना एसटी कामगारांनी प्रशासनाला गंभीर इशारा दिला आहे. मुदतीपूर्वी प्रश्न सुटले नाहीत तर कर्मचारी आंदोलन तीव्र होईल असा इशाराही यावेळी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिला आहे.
एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार
एसटी कामगारांच्या चळवळीच्या इतिहासात पहिल्यांदाच मशाल मोर्चा काढण्यात येणार असून तो 12 ऑक्टोबरच्या रात्री बारा वाजल्यापासून होणार असून या आंदोलनाचे रूपांतर पुढे बेमुदत ठिय्या आंदोलनात होणार आहे. त्याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊन प्रवाशांची गैरसोय होऊ नये अशी आमची इच्छा असून प्रशासनाने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे असे यावेळी बरगे यांनी सांगितले. सन 2016 पासूनचा एसटी कामगारांचा 1100 कोटी रुपयांचा महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही. वेतनवाढ फरकाची 2318 कोटी रुपयांची रक्कम देण्यात आलेली नाही. या शिवाय 17000 हजार रुपये इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात यावी अशी मागणी संघटनेने केली आहे. तसेच 12500 सण उचल मिळाली पाहिजे अशीही मागणी करण्यात आली.
महत्वाच्या बातम्या:
Gunaratna Sadavarte : 'ठाकरे-पवारांचं सरकार पाडण्यासाठीच 6 महिने एसटीचं आंदोलन केलं', बिग बॉसच्या घरात सदावर्ते काय म्हणाले?



















