'एसटी आगारातून खाजगी वाहतूक सोडणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई करा'
एबीपी माझा वेब टीम | 31 Oct 2017 05:17 PM (IST)
संप काळात न्यायालयाचे आदेश डावलून एसटी आगारात खासगी वाहतूक सुरु करणाऱ्या मंत्री आणि अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
मुंबई : चार दिवस संपाच्या मोबदल्यात एसटी कर्मचाऱ्यांचा 36 दिवसांचा पगार कापण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतल्यानंतर आता एसटी कर्मचारी पुन्हा आक्रमक झाले आहेत. संपकाळात एसटी महामंडळाचं नुकसान भरुन घेण्यासाठी न्यायालयाचे नियम पुढे करत 36 दिवसांचा पगार कापण्याचे आदेश काढले. मात्र न्यायालयाच्या नियमानुसार एसटी आगारात खासगी वाहतूक सुरु करता येत नाही, असं असतानाही महामंडळानं खासगी वाहतुकीला परवानगी दिली, असं एसटी कर्मचारी संघटनांनी म्हटलं आहे. कायदा सर्वांसाठी समान असल्यानं परिवहन मंत्री आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जावी, अन्यथा आपण न्यायालयात जाऊ असा इशारा इंटकतर्फे देण्यात आला आहे.