मागणी 325 कोटींची पण सरकारकडून मिळाले 100 कोटी रुपये, एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी, आंदोलन मागे घेण्याचं सरनाईकांचं आवाहन
एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वेतनवाढीतील रक्कम अदा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी होती.
मुंबई : एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. वेतनवाढीतील रक्कम अदा न केल्याने एसटी कर्मचाऱ्यांची नाराजी होती. अशातच एसटी संघटनांकडून आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. दरम्यान, एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे 325 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. मात्र, त्यातील फक्त 100 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात सवलतमूल्य रक्कम अदा करण्यातही कात्री लावली जात असल्याने एसटीच्या आर्थिक अडचणींत वाढ झाली आहे.
दरम्यान, 100 कोटी रुपये महामंडळाला मिळाल्याने महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसकडून बोंबा मारो आंदोलन स्थगित करण्यात आलं आहे. एसटीच्या सुमारे 86 हजार कर्मचाऱ्यांचे वेतन वाढीचे थकीत हप्ते देण्यासाठी शासनाने तातडीने 100 कोटी रुपयांची तरतूद केली असून लवकरच फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात सोबत देण्यात येणारा वेतन वाढीचा थकीत हप्ता कर्मचाऱ्यांच्या बॅक खात्यात जमा होईल. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. तसेच या अनुषंगाने येत्या 24 फेब्रुवारीला काही कामगार संघटनांनी पुकारलेल्या आंदोलन मागे घ्यावे असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
मंत्री सरनाईक म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांना वेतन वाढीच्या थकीत हप्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे पैसे नसल्यामुळे शासनाने ती जबाबदारी उचलावी. अशी चर्चा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन दिवंगत उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजितदादा पवार व सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी केली होती. त्यानुसार त्यांच्या अनुमतीने दरमहा सुमारे 65 कोटी रुपये शासनाने अनुदान स्वरूपात एसटीला द्यावेत असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कामगार संघटनांच्या सोबत घेतलेल्या बैठकीमध्ये दिले होते.
सदर थकीत हप्ते डिसेंबर महिन्याच्या वेतनात सोबत देण्यास सुरुवात झाली. तथापि काही तांत्रिक अडचणींमुळे फेब्रुवारी महिन्याच्या वेतनासोबत सदर हफ्ता देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे थकीत हप्ता न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची भावना एसटी कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होऊन त्यांच्यात नाराजी पसरली. अशा परिस्थितीत काही कामगार संघटनांनी आंदोलनाच्या पवित्रा घेतला होता. सदर गंभीर परिस्थिती ओळखून परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दोन्ही उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांचीशी चर्चा करून या थकीत हप्त्यापोटी 210 कोटी रुपये तातडीने सरकारने एसटीला द्यावेत अशी विनंती केली. त्याचा सातत्याने पाठपुरावा देखील केला. त्यामुळे त्या 210 कोटी रुपयांपैकी 100 कोटी रुपये आज शासनाने दिले असून उर्वरित निधी देखील लवकरच प्राप्त होईल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे हप्ते कोणते परिस्थितीमध्ये देण्यात येतील असे ठाम आश्वासन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाच्या वतीने दिले आहे. तसेच सध्या दहावी व बारावीच्या मुलांच्या परीक्षा सुरू असल्यामुळे त्यांच्या प्रवासात कोणते अडथळा निर्माण होऊ नये यासाठी काही संघटनांनी पुकारलेले आंदोलन तातडीने स्थगित करावे. असे देखील आवाहन त्यांनी यावेळी केले आहे.

























