मुंबई : अडीच हजार रुपये दिवाळी भेट आणि महागाई भत्त्यात वाढ देण्याच्या निर्णयावर एसटी कामगार संघटनांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता मिळावा या मागणीसाठी राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांनी आज  पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. कर्मचा-यांचे आंदोलन तीव्र झालं तर दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागू शकतो.  दिवाळी तोंडावर असतान  एसटी कर्मचा-यांच्या मात्र तोंडचा घास पळाला आहे निराशेनं आणि आर्थिक विवंचनेनं आतापर्यंत 26 एसटी कर्मचा-यांनी  आत्महत्या केली आहे.  


काय आहेत एस टी कर्मचा-यांच्या मागण्या



  • महागाई भत्ता देण्यात यावा

  • वार्षिक वेतनवाढ ही दोनवरून टक्क्यांवरून तीन टक्के करण्यात यावी. 

  • घरभाडे भत्ता 8, 16, 24 % प्रमाणे देण्यात यावे.

  • दिवाळीपूर्वी वेतन मिळावे 


औरंगाबाद :


विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळातील सर्व संघटनांच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने बेमुदत उपोषण सुरू केले आहे. आज औरंगाबाद मधील विभागीय नियंत्रक कार्यालयात एसटी कर्मचऱ्यानी बेमुदत उपोषणाला सुरवात केली आहे. कर्मचारी संघटना उपोषणाच्या निर्णयावर ठाम आहेत. मागण्या पूर्ण न झाल्यास बससेवा बंद करू असा इशारा यावेळी देण्यात आला  आहे. 


मनमाड :


कर्मचा-यांनी उपोषणाचे हत्यार उपसल्याने मनमाड येथील बस सेवा ठप्प झाल्याने सकाळपासून एसटी डेपोतून एकही बस बाहेर जाऊ शकली नाही त्यामुळे अनेकांचे हाल झाले तर या कर्मचा-यांनी उपोषण सुरु केले आहे.


बीड :


राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर एसटी कर्मचारी आंदोलन करत आहेत बीड शहरामध्ये  बसस्थानकासमोर एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलन सुरू केला आहे उद्यापर्यंत या आंदोलनासंदर्भात सरकारने कोणताही निर्णय नाही घेतला तर मग मात्र आम्ही जिल्ह्यातील प्रत्येक डेपोच्या समोर असे आंदोलन सुरू करू असा इशारा यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे