Buldhana News : धावत्या बसमध्ये बस चालकांचं ऑन ड्युटी मद्यप्राशन, बस स्थानकात राडा; प्रवाशांना दोन तास धरलं वेठीस, परतवाडा-पुणे बस मधील प्रकार
Buldhana News : राज्य परिवहन मंडळाच्या परतवाडा आगारातून पुण्यासाठी निघालेल्या धावत्या बसमध्ये बस चालक चक्क ऑन ड्युटी मद्यप्राशन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Buldhana News : राज्य परिवहन मंडळाच्या परतवाडा आगारातून पुण्यासाठी निघालेल्या धावत्या बसमध्ये बस चालक चक्क ऑन ड्युटी मद्यप्राशन करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नव्हे तर या मद्यधुंद बस चालकाने खामगाव बस स्थानकात (Khamgaon Bus Depot) धिंगाणा घालत राडा घातला आहे. सोबतच परतवाडा-पुणे (Parthwada-Pune bus) या बसमधील प्रवाशांना दोन तास वेठीस धरलं आहे. दरम्यान हा संपूर्ण प्रकार एबीपी माझाला कळताच या प्रकरणी जाब विचारण्यात आला. त्यांनतर हा प्रकार उघडकीस आला असून त्यामुळे प्रवाशांनी एबीपी माझाचेही आभार मानले आहेत. मात्र आता ऑन ड्युटी मद्यप्राशन करून प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या बसचाकावर नेमकी कोणती कारवाई केली जाते, हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
Khamgaon Bus News : धावत्या बसमध्ये मद्यपान, माद्याच्या अनेक बॉटल्सही आढळल्या
राज्य परिवहन मंडळाची परतवाड्याहून पुण्याला निघालेल्या परतवाडा आगाराच्या शयनयान बस मधील चालक हा चक्क मद्यप्राशन करून बस चालवत असल्याचा प्रकार समोर आलाय. यानंतर धावत्या बसमधील प्रवाशांनी 'एबीपी माझा'ला या संदर्भात माहिती दिली त्यावेळी बस ही खामगाव बस स्थानकात पोहोचली होती. ही बस परतवाडा येथून पुण्याला निघाली होती. त्यावेळी परतवाडा आगारातीलच दोन बस चालक व दोन वाहक या बस मध्ये होते. यातील बस चालवणारा चालक व सहचालक हे दोघेही धावत्या बसमध्ये मद्यधुंद अवस्थेत मद्यपान करत होते. या बसमध्ये माद्याच्या अनेक बॉटल्सही आढळल्या.
Khamgaon News : मद्यधुंद चालकांचा एबीपी माझाच्या कॅमेरामॅनवर हल्ला करण्याचा प्रयत्न
दरम्यान, चालक हा मद्यधुंद अवस्थेत होता, तर जालन्याहून दुसरा चालक ही बस पुण्यापर्यंत चालवणार होता. तोही मद्यधुंद अवस्थेत बसमध्ये होता. तर दारूच्या बॉटल देखील बसमध्ये आढळून आल्यात. यावेळी या दोन्ही बस चालकांनी खामगाव बस स्थानकावर मोठा राडा घातला. यावेळी पोलिसांना ही पाचारण करण्यात आलं आणि त्यामुळे बस ही दोन तास उशिराने पुण्याकडे रवाना झाली. यामुळे मात्र प्रवाशांना मोठा मनस्ताप झाला. एबीपी माझा ने याप्रकरणी जाब विचारल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. परिणामी प्रवाशांनी एबीपी माझाचेही आभार मानले. यावेळी वृत्तांकन करत असताना एबीपी माझाच्या कॅमेरामॅन शांताराम तायडे यांच्यावर या मद्यधुंद चालकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

























