MSRTC ST Bus : वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणे धोकादायक असून जीवघेणा अपघात घडू शकतो, अशी वारंवार सूचना देण्यात येते. वाहतूक पोलिसांकडून अशा चालकांवर कारवाईदेखील करण्यात येते. मात्र, अनेकदा या नियमांचे उल्लंघन होताना सर्रासपणे दिसते. एसटी चालकांकडूनही बस चालवताना मोबाईलचा वापर होत असल्याचे आढळून आले आहे. अशा चालकांवर आता थेट कारवाईचा बडगा उचलण्यात येणार आहे. एसटी महामंडळ प्रशासनाने हा इशारा दिला आहे.
एसटी बस चालवत असताना मोबाईल फोनवर बोलणे अथवा हेडफोन घालून मोबाईलवरील गाणी, व्हिडीओ पाहणे अशी चालकाची एकाग्रता भंग करणारी कृत्ये चालकाकडून घडल्यास त्यांच्यावर सध्या असलेल्या नियमानुसार कडक कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी प्रशासनाने दिले आहेत.
एसटीचा प्रवास हा सुरक्षित प्रवास म्हणून ओळखला जातो. गेली 75 वर्षे प्रवाशांची विश्वासर्हता जपण्यामध्ये एसटीच्या निर्व्यसनी आणि सुरक्षित वाहन चालवणाऱ्या चालकांचा खुप मोठा वाटा आहे. परंतू गेल्या काही दिवसांमध्ये एसटी बस चालवित असतांना मोबाईलवर बोलणे, कानात हेडफोन घालून गाणी ऐकणे, मोबाईलवरील व्हिडीओ पाहणे अशा चालक आणि प्रवाशांचादृष्टीने अत्यंत धोकादायक असलेल्या कृत्यामुळे बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
याबाबत सोशल मीडिया लोकप्रतिनिधींमार्फत अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे दाखल झाल्या आहेत. यापुढे अशा घटना निर्दशनास आल्यास संबंधीत चालकावर निलंबनापर्यंतची कार्यवाही करण्याचे निर्देश एसटी वरिष्ठ प्रशासनाने दिले आहेत.