जालना : आजपासून दहावीची परीक्षा सुरु झाली असताना परीक्षेच्या पहिल्याच दिवशी पेपर व्हायरल झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातल्या दहिफळ खंदारे गावात मराठीचा पेपर व्हॉट्सअॅपवर व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवारी सकाळी 11 वाजता मराठीच्या पेपरला सुरवात झाली. मात्र 11 नंतर अवघ्या 10 मिनिटात पेपर परीक्षा केंद्राबाहेर विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झालेला पाहायला मिळाला. तसेच या गावातील ज्ञानदीप हायस्कुल शाळेच्या आवारातील परीक्षा केंद्रावर कॉप्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला.

या परीक्षा केंद्रावर बाहेरून कॉप्या पुरवण्याचे प्रकार सुरु होते. मात्र भरारी पथक आणि परीक्षा प्रवेक्षकांच मात्र या प्रकाराकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान एबीपी माझा वर बातमी झळकल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झालं.

प्रशासनाच्या मते एखाद्या विद्यार्थ्यांने वर्गात जाऊन फोटो काढून तो व्हायरल केला असावा. मात्र प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशी करणार असल्याचं सांगीतलं.

दरम्यान या वर्षी दहावीच्या परीक्षेला पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण विभागातून 17 लाख विद्यार्थी बसले आहेत. यामध्ये 7 लाख मुलींचा समावेश आहे. यासोबत यंदा तब्बल 8 हजार 800 दिव्यांग विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत.