सोलापूर : सोलापूरच्या शेटफळमधले राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष मनोहर डोंगरे यांच्यावरील प्राणघातक हल्ल्यानंतर डोंगरे समर्थकांनी राडा घातला. समर्थकांनी अनेक ठिकाणी दगडफेक करुन जाळपोळ केली. कार्यकर्त्यांकडून सोलापुर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. त्यामुळे काही वेळासाठी वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
देवदर्शन करण्यासाठी मंदिरात गेले असताना डोंगरेंवर हल्ला झाला होता. पूर्ववैमनस्यातून दहा ते बारा जणांनी तलवारीने हल्ला केल्याची माहिती आहे. डोंगरे गटाने यापूर्वी केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी स्थानिक राजकारणी भांगे यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.
मनोहर डोंगरे यांची प्रकृती चिंताजनक असून अश्विनी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांच्या मानेवर, पाठीवर, नाकावर असे 25 ते 27 वार करण्यात आले आहेत. डोक्यावर वार असल्यामुळे डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.