Solapur Rain Update: राज्यातील मुंबई, पुण्यासह सोलापूर आणि इतर ठिकाणी मान्सूनचा पाऊस दाखल झाला आहे. गेल्या दोन दिवस झालेल्या तुफान पावसामुळे सोलापुरातील भीमा आणि नीरा नद्यांनी आक्राळविक्राळ रूप घेतलं आहे. नीरा आणि भीमा या नद्यातून आलेल्या पाण्यामुळे आता देवाचे विश्रांती स्थान अशी ओळख असलेले विष्णुपदाचे मंदिरही पूर्णपणे बुडाले आहे. संपूर्ण मार्गशीर्ष महिना देव विश्रांतीसाठी विष्णू पदावर येत असतात अशी मान्यता आहे. हे एक पुरातन मंदिर असून या मंदिरात विष्णूच्या पायाचे ठसे, गाईंच्या पायाच्या खुणा, कृष्ण रुपातील गुराख्याची काठी आणि गोपाळकाल्याचे भांडे या सर्व खुणा एका मोठ्या दगडी शिळेवर आहेत.
नीरा नदीतून आलेल्या पाण्यामुळे चंद्रभागेची पाणी पातळी तब्बल दोन मीटरने वाढली असून वाळवंटातील सर्व मंदिरे पाण्यात गेलेले आहेत .. तसेच गोपाळपूर पाशी असलेले आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे हे विष्णू पदाचे मंदिरही पूर्णपणे पाण्याखाली गेले असून त्याच्या शेजारी असलेला हनुमान मंदिर नारदाचे मंदिरही पाण्यात बुडाले आहे .
भीमा नीरा नद्यांनी धारण केलं रौद्ररूप
पंढरपूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु असल्याने भीमा नदीची (Bhima River) पातळी कमालीची वाढली आहे. त्यातच गुरसाळे येथे भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात (Mahadev Mandir) तीन महाराज अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन (Disaster Management) पथकाने या महाराजांना बोटीतून सुखरूप बाहेर काढले आहे. अकलूजमध्ये ऐन मे महिन्यात नीरा नदीचे उग्र रूप पाहायला मिळत आहे. मे महिन्यात कायम कोरडी पडणारी नीरा नदी आज दुथडी भरून वाहू लागलेली आहे . आज सकाळी अकलूज येथील अकलाई मंदिरात पाणी शिरले आहे. नीरा नदीच्या काठावर असणाऱ्या या अकलाई मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. आज अमावस्येच्या निमित्त दर्शनाला आलेल्या अकलूजकरांनी नीरेचे हे रौद्ररूप पाहण्यासाठी गर्दी केली आहे.
तालुक्यातील ओढे, नाले ओव्हर फ्लो होऊन वाहत असून दहिगाव येथील पुलावर जवळपास चार ते पाच फूट पाणी आज सकाळी होती. आता पाणी ओसरल्याने येथील वाहतूक सुरू झाली असली तरी अजूनही काल पडलेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात या ओढ्याला येऊन मिसळताना दिसत आहे.
हेही वाचा: