Solapur Rain News : सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील अनेक तालुक्यात मागील काही दिवसात अतिवृष्टी (Heay Rain) झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळं अनेकांच्या शेतात पाणी साचून आहे. यामुळं शेतकऱ्यांची (Farmers) उभी पिकं ऐन काढणीला आल्यानंतर पिवळी पडत आहेत. त्यामुळं बळीराजा चिंतातूर झाला आहे. दिवाळीच्या तोंडावर झालेल्या नुकसानीमुळे आता बळीराजा सरकारकडे आशेने पाहत आहे. सोलापुरातील तरटगाव येथील रामचंद्र वाघमारे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झालं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्याना पावसानं झोडपलं आहे. गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेतीचे या पावसानं नुकसान झालं आहे. मोहोळ तालुक्यातील अनेक गावामध्ये सध्या पूरसदृश्य परिस्थिती आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या सोबत शेतात पाणी शिरल्याने पिकांची हानी झाली आहे. मोहोळ तालुक्यातील तरटगावात शेतकऱ्यांच्या पिकांचं खूप मोठं नुकसान झालं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात मागील काही दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेलीय. मोहोळ तालुक्यातून वाहणाऱ्या सीना नदीला पूर आल्याने नदी काठावरची शेती पाण्याखाली गेलीय. हाता तोंडाशी आलेलं पिकात छातीएवढं पाणी आल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झालं आहे. मोहोळ तालुक्यातील दादासाहेब हराळे यांच्या 8 एकर क्षेत्रात अक्षरशः तलावाचे रूप प्राप्त झालं आहे. शेतातील मका, ऊस, उडीद ही पिकं अक्षरशः पाण्यात आहेत.
नदीकाठी असलेल्या ऊसासह केळी आणि सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान
दरम्यान, सीना नदीला पूर आल्यामुळे शेतीचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नदीकाठी असलेल्या ऊसासह केळी आणि सोयाबीन मोठे नुकसान झालं आहे. उभी पिक पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. त्याचबरोबर विजेच्या मोटारी देखील पाण्याखाली गेल्या आहेत.
नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांची मागणी
प्रशासनाने तातडीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर धाराशिव जिल्ह्यातील सीना कोळगाव धरणात ज्यावेळी पूरस्थिती निर्माण होते त्यावेळी सीना नदीत पाणी सोडलं जातं. पण ज्यावेळी उन्हाळ्यात साधारणत: मे महिन्यात सीना नदी काठच्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज असते त्यावेळी मात्र पाणी सोडलं जात नाही. त्यामुळे उन्हाळ्यात सीना कोळेगाव धरण प्रशासनाने १ टीएमसी पाणी सीना नदीत सोडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अन्यथा पावसाळ्यात सीना कोळेगाव धरणाचे पाणी सीना नदीत सोडू नये, त्यांनी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या: