पंढरपूर: राज्यातील काँग्रेसचे मंत्री गर्भगळीत आणि कणा नसलेले असून ते सध्या सोनियांचे ऐकतात की शरद पवारांचे हाच प्रश्न आहे असा टोला प्रकाश आंबेडकर यांनी लगावला. दलितांच्या पंढरपूर मंदिर प्रवेशास 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्त  राष्ट्र सेवा दलाच्या वतीनं आज पंढरपूर येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 


सध्याच्या राजकारणामुळे राज ठाकरे यांना मोठा फायदा होत असून त्यांच्यामुळे शिवसेना आणि भाजप दोघांचेही नुकसान होत असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते म्हणाले की, "भाजप ही गोष्ट मानायला तयार नसला तर मग फडणवीस यांना त्यांची सभा सायनाला का घ्यावी लागली? त्यांना सभेत फक्त बाबरी मशिदीवर का बोलावे लागले याचे उत्तर द्यावे. जर राज ठाकरे यांनी आगामी काळात योग्य पाऊले टाकली तर सर्व ठिकाणी त्यांचे नगरसेवक निवडून येताना दिसतील. सध्याच्या परिस्थितीचा राष्ट्रवादी अग्रेसिव्ह राहून फायदा उठवत आहे."


प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महापालिकांमध्ये शिवसेना मुंबई मध्ये कोणाशी युती करू इच्छित नाह. राष्ट्रवादी पुणे जिल्ह्यात एकटी लढू पाहत असून काँग्रेस नागपूरमध्ये एकटी लढण्याच्या तयारीत आहे. फक्त ओबीसी आरक्षणाचा बागुलबुवा उभा करीत हे तीनही पक्ष निवडणूक पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत."


राज्य निवडणूक आयोगाला वंचित आघाडीची नोटिस 
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार आता राज्यातील नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणूक घेणे अपेक्षित असताना ते टाळण्याचा प्रयत्न निवडणूक आयोगाकडून होत आहे. त्यामुळे आमच्या लीगल सेलने निवडणूक आयोगाला नोटिस बजावली आहे. हा फौजदारी गुन्हा असून राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना त्यांच्यावर हा गुन्हा दाखल व्हावा असे वाटत नसेल तर ते निवडणुकांची घोषणा करतील. 


जेलवारी पासून वाचण्यासाठी राणा दाम्पत्याची धडपड सुरु असून त्यांच्या खोट्या प्रमाणपत्राबाबत केस ही भाजपनेच टाकली होती असे आंबेडकर यांनी सांगितले. छत्रपती संभाजीराजे यांनी नवीन पक्ष स्थापन करावा, आम्ही त्यांच्यासोबत असू अशा शुभेच्छा प्रकाश आंबेडकरांनी संभाजीराजे याना दिल्या.