Solapur Pandharpur News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Rain) सुरु आहे. यामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. नदी नाले धरणे तुडुंब झाली आहे. अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्याती माढा तालुक्यातील उजनी धरण देखील ओव्हर फ्लो झालं आहे त्यामुळं या धरणातून मोठ्या भीमा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तसेच वीर धरणातूनही भीमा नदीत विसर्ग सुरु असल्यानं पंढरपूरवर पुराची टांगती तलवार आहे. 

उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग 61 हजार 600 क्युसेक करण्यात आला आहे. तर वीर धरणातून 47 हजार 454 क्युसेक इतका विसर्ग नीरा नदीत सोडण्यात येत आहे. दोन्ही धरणाचा विसर्ग पंढरपूरकडे येत असून पंढरपूरवरील पुराचा धोका वाढू लागला आहे. दरम्यान उजनी व वीर धरणाच्या पाण्यामुळे भीमा व निरा नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आलेला आहे. 

सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

सांगली जिल्ह्यातील 4 तालुक्यातील शाळांना उद्या आणि परवा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी हे आदेश दिले आहेत.मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामधील तसेच मनपा क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय शाळांना दिनांक 20 व 21 ऑगस्ट या दोन दिवस सुट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यात होत असलेला पाऊस तसेच कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाच्या ठिकाणी पाणी पातळीत होणारी वाढ, कोयना व वारणा धरणांचा विसर्ग इत्यादी सर्व बाबी लक्षात घेता शाळांना सुट्टीचे आदेश देण्यात आले आहेत. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी अतिवृष्टीच्या अनुषंगाने सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. सिंधुधुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीव विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळं सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर

ठाणे जिल्ह्यात सद्यस्थितीतील अतिवृष्टी विचारात घेऊन व हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेल्या शक्यतेच्या पार्श्वभुमीवर अतिवृष्टीच्या अनुषंगाने इयत्ता 1 ली ते 12वी च्या सर्व माध्यमाच्या/मंडळाच्या शालेय विद्यार्थ्यांची शाळेत ये-जा करण्याची गैरसोय होऊ शकते. याचा विचार करता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील सर्व शाळांना दिनांक 20 ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या:

ठाणे, साताऱ्यासह 5 जिल्ह्यात शाळांना सुट्टी; अतिवृष्टीचा अंदाज, प्रशासनाला अलर्ट राहण्याचे आदेश