मोहिते पाटलांच्या आंदोलनानंतर वेळापुरात दुसरा अंक सुरु, पोलिसांच्या समर्थनासाठी ग्रामस्थांचा ठिय्या
Solapur : वेळापूर येथील काही ग्रामस्थांनी मिळून वादग्रस्त पोलीस अधिकारी गोसावी याच्या समर्थनार्थ मोर्चा काढत वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये आता ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
Solapur : सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर येथे काल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला मारहाण झाल्याची घटना घढली होती. यानंतर शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तम जानकर यांनी पोलीस ठाण्यात या आंदोलन सुरु केले होते. यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांचे निलंबन करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर मोहित पाटील आणि जानकर यांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, आता या घटनेचा पुढचा अंक आज समोर आला आहे. वेळापूर येथील काही ग्रामस्थांनी मिळून वादग्रस्त पोलीस अधिकारी गोसावी याच्या समर्थनार्थ मोर्चा काढत वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये आता ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.
एकतर्फी कारवाई न करता संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी
पोलिसांच्या समर्थनार्थ आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी याच्यावर एकतर्फी कारवाई न करता संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आता एका पोलिस अधिकाऱ्यासाठी नवीन राजकारण सुरु झाले असून या सर्व प्रकारामुळं जिल्हा पोलीस प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
कार्यकर्त्यांच्या मारहाणी विरोधात खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि माळशिरसचे आमदार उत्तमराव यांचे दोन तासाहून अधिक काळ पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन सुरु होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्या निलंबनाच्या आश्वासनानंतर आमदार खासदारांनी आंदोलन थांबवले आहे. निलेश तुपे या तरुणाला सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांच्याकडून मारहाण झाली होती. या घटनेच्या निषेधार्थ वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि आमदार उत्तमराव जानकर यांनी आंदोलन सुरु केले होते. दोन तासानंतर हे आंदोलन थांबवण्यात आलं आहे.
वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोप
वेळापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी मंगेश तुपे या तरुणाला मारहाण केली. यानंतर आमदार उत्तम जाणकार आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक होऊन थेट पोलीस ठाण्यात आंदोलनात बसले होते. तब्बल दोन तासाच्या आंदोलनानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी यांची तात्काळ बदली करून निलंबित करण्याच्या आश्वासनानंतर आमदाराने खासदारांचे आंदोलन थांबले आहे. आमदार व खासदार यांनी वेळापूर पोलीस ठाणे आणि येथील अधिकारी भाजपच्या दबावात काम करत असल्याचा आरोपही या निमित्ताने केला. प्रसंबंधीत प्रकरणाची सखोल चौकशी करून तात्काळ पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठवणार असल्याचा खुलासा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्फत करण्यात आला आहे.
























