सोलापूर :  उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी होणाऱ्या पाणी पुरवठ्यावरुन आमदार प्रणिती शिंदे आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. उजनी धरणात मुबलक पाणी असताना देखील शहराला चार ते पाच दिवसाआढ पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थित अधिकाऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळालं. 


सोलापूर शहराला उजनीतून पाणी पुरवठा करण्यासाठी नियोजित असलेल्या दुहेरी पाईपलाईनच्या कामास विलंब होतोय. त्यावरुन आमदार प्रणिती शिंदे यांनी अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. तसेच आज पत्रकार परिषदेत 'प्राण जाये पर पाणी न जाये' अशी घोषणाच प्रणिती शिंदे यांनी दिली. येणाऱ्या उन्हाळ्याचं नियोजन पालिकेनं करावं तसेच येणाऱ्या काळात एक दिवसाआढ पाणी पुरवठा व्हावा अशी भूमिका असल्याची माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली. 


मदतीचा एक घास योजना 
दरम्यान या पत्रकार परिषदेत आमदार प्रणिती शिंदे यांनी लॉकडाऊनच्या काळासाठी एका समाज उपयोगी योजनेची घोषणा केली. मदतीचा एक घास अशी योजना काँग्रेस कार्य़कर्त्यांमार्फत सोलापुरात राबविली जाणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली. लॉकडाऊनच्या काळात गोरगरिब जनतेचे मोठे हाल होतात. हे लक्षात घेऊन प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या घरात दररोज 10 ते 20 चपाती तसेच भाजी तयारी केली जाईल. हे सर्व अन्न एकत्रित करुन शहरात जवळपास 10 ठिकाणांच्या माध्यमातून गरजूना वितरीत केले जाईल अशी माहिती आमदार प्रणिती शिंदे यांनी दिली.