Solapur : सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयकुमार देशमुख (Vijay Kumar Deshmukh) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासमोरच खंत व्यक्त केली आहे. मागील दोन वर्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकडे काहीसं दुर्लक्ष केल्याची खंत देशमुख यांनी बोलून दाखवली आहे. तसेच उत्तर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना त्रास दिला जात असल्याचेही विजयकुमार देशमुख म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत दहिटणे व शेळगी, जि. सोलापूर येथील 1348 सदनिकांचे वितरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमात विजयकुमार देशमुख बोलत होते.
मुख्यमंत्री सोलापुरात उद्योगासोबतच आयटी पार्क देखील आणतील
मुख्यमंत्री सोलापुरात उद्योगासोबतच आयटी पार्क देखील आणतील हा माझा विश्वास असल्याचे विजयकुमार देशमुख म्हणाले. साहेब या लोकांनी मला शहर उत्तर या मतदारसंघातून पाच वेळ निवडून आणले आहे. 40 वर्ष या मतदारसंघात भाजप आहे. मात्र आजकाल हे कार्यकर्ते थोडे नाराज आहेत. काही लोक कुरघोड्या करतात. त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करतात. मात्र शहर उत्तर आहे. जे जे आदेश तुम्ही दिले आम्ही ते सर्व मानले. उत्तरच्या कार्यकर्त्यांना जर त्रास दिला तर उत्तरचे कार्यकर्ते आता योग्य उत्तर देतील असेही विजयकुमार देशमुख म्हणाले.
घार आकाशात असली तरी तिची नजर ही जमिनीवर असते
आज आपण या कार्यक्रमात आलात पण गेल्या दोन वर्षात आपली मर्जी थोडी कमी झाली असं वाटतं होतं. 2014 मध्ये तुम्ही जितकं नागपूरला गेला नाही तितक्या वेळेस सोलापूरला आला होतात असे विजयकुमार देशमुख म्हणाले. मुख्यमंत्री साहेबानी थोडंसं दुर्लक्ष केलेलं असलं तरी घार आकाशात असली तरी तिची नजर ही जमिनीवर असते तसं साहेबांचे आहे, असं विजयकुमार देशमुख म्हणाले.
आयटी पार्कसाठी सोलापूरमध्ये उत्तम अशा प्रकारची जागा शोधा, मुख्यमंत्र्यांच्या सूचना
आयटी पार्कसाठी सोलापूरमध्ये उत्तम अशा प्रकारची जागा शोधा अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. आयटी कंपन्यांना देखील आम्ही याठिकाणी घेऊन येऊ असे ते म्हणाले. कनेक्टीविटीमुळं उद्योगाता भरभराटी कशी आणायची यासाठी येणाऱ्या काळात प्रयत्न करु असे फडणवीस म्हणाले. आमचं सरकार सोलापूरच्या पाठिशी खंबीरपणाने उभं असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
महत्वाच्या बातम्या: