Solapur Fire News :सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड एमआयडीसी (MIDC) भागात कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री 3 च्या सुमारास लागली भीषण आग लागली होती. आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला आहे, तर अद्यापही 4 जण कारखान्यात अडकल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची मोठी टीम पोहोचली आहे तर पोलिसांचाही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावर माजी आमदार नरसय्या आडम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सेंट्रल टेक्स्टटाईल्स हा एमआयडीसी परिसरातील फार मोठा टॉवेल उत्पादक कारखाना आहे. या कारखान्यामध्ये जवळपास 200 कामगार काम करतात. ही आग कशामुळं लागली याचा अद्यापही पत्ता नाही. सर्वात महत्वाची बाब म्हणजे सेंट्रल टेक्स्ट टाईल्स कंपनीच्या मालकाचे नातेवाईक या आगी दरम्यान एका खोलीत अडकल्याचा माहिती नरसय्या आडम यांनी दिली आहे. त्यांना काढण्याचे प्रयत्नही होत नाहीयेत असा आरोप माजी आमदार आडम यांनी केला आहे.
महापलिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ
महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मी यासंदर्भात पाऊल उचलण्यासाठी सांगितलं असून त्या लोकांना जिवंत बाहेर काढणं गरजेचं आहे असे आडम म्हणाले. याठिकाणी आग लागून जवळपास 10 तास झाले आहेत. महापलिका आणि पोलीस प्रशासन यंत्रणा निष्फळ झाली असल्याचे आडम म्हणाले. यामध्ये नातेवाईकांनी केलेले आरोप हे खरे आहेत. अग्नीशमाक दलाची गाडी लवकर आली नाही. त्याचवेळेस गाड्या आल्या असत्या तर अनर्थ टळला असता असे आडम म्हणाले. या संबंधी मी मुख्यमंत्री यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार असून या सर्व प्रकारची चौकशी राज्य सरकारने करावी अशी मागणी करणार आहे असे आडम म्हणाले. यासंबंधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे झालेले आर्थिक नुकसान भरुन देण्याची मागणी करणार आहे असे आडम म्हणाले.
कारखान्यात अडकलेल्या चौघांचा अद्यापही शोध सुरुच
सोलापुरातील एमआयडीसी भागातील कारखान्याला आग लागून जवळपास 10 तास उलटले आहेत. कारखान्यात अडकलेल्या चौघांचा अद्यापही शोध सुरुच आहे. कारखान्यात असलेले साहित्य अद्यापही धूमसत असल्याने आतमध्ये जाण्यास अडचण होत आहे. भिंत फोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी आत शिरण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठ्या प्रमाणात धूर असल्याने प्रयत्न अयशस्वी झाला आहे. जवळपास दीड ते दोन तास अग्निशमाक दलाचे जवान आतमध्ये होते. मात्र, अडकलेल्या चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही.
