Solapur Rain:सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून नदी-नाले तुडुंब भरले आहेत, अनेक भागांत शेतकरी व विद्यार्थी पावसामुळे त्रस्त झाले आहेत. बार्शी तालुक्यातील वैराग परिसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापूरमध्येही रात्रीच्या २–३ तासांच्या जोरदार पावसाने राजाराम बंधारा पाण्याखाली गेला. पंचगंगा नदीची पाणीपातळी झपाट्याने वाढल्याने ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांचे वाहतूक मार्ग विस्कळीत झाले आहेत. ढगफुटी सदृश पावसामुळे परिसरातील नदी-नाले तुडुंब भरले असून, विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहत्या पाण्यातून उडी मारावी लागत आहे. पिंपरी पारेसारख्या भागात शाळेत जाणारे विद्यार्थी ओढ्याच्या पाण्यातून सुरक्षित मार्ग शोधत आहेत. पाण्याची पातळी सतत वाढत असल्याने शाळेत जाणं विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी x माध्यमावर पोस्ट करत अडचणीत सापडलेल्या बळीराजाला हात देण्यासाठी तातडीने ५० हजार रु. प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी आणि कर्जमाफीसाठी अधिक वाट न बघता #हिच_ती_योग्य_वेळ हेही ध्यानात घ्यावं…! अशी मागणी केलीय.
सोलापुरात तुफान पाऊस, बळीराजा अडचणीत
बार्शी तालुक्यातील आगळगाव आणि उंबरगे गावात काल ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे ओढ्याचा प्रवाह बदलला आणि उंबरगे येथील हावळे ओढ्याला पूर आला. ओढ्याचे पाणी शेतकऱ्यांच्या शेतात शिरल्याने बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे. उंबरगे गावातील शेतकरी कुमार जोडगे यांच्या ड्रॅगन फूडच्या पीक जमिनीत पाणी घुसल्याने त्यांच्या पीकाचा मोठा नुकसान झाला. शेतातील विहीर सुमारे 70 फूट खोल असून, पावसामुळे त्यात 40 फूट पाणी मातीने भरले. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे 5 ते 6 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिक शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. प्रशासनाने ओढ्यावर पूल बांधण्याची आणि पावसाळ्याच्या हंगामात पूर प्रतिबंधक उपाययोजना करण्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. या मुसळधार पावसामुळे बार्शी तालुक्यात शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. बळीराजाला हात देण्यासाठी तातडीने 50हजार रु. प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार रोहित पवार यांनी x माध्यमावर पोस्ट करत केलीय.
काय म्हणाले रोहित पवार?
जातीधर्मामध्ये वाद लावणाऱ्या सरकारला सांगायचंय.. की आज अतिवृष्टीमुळं राज्यातील १४ लाख हेक्टरहून अधिक शेतीचा चिखल झालाय, त्यामुळं अडचणीत आलेला बळीराजा आक्रोश करतोय. यात कोणत्याही एका जातीचा नाही तर सर्व जाती-धर्माचे शेतकरी आहेत. या अडचणीतील बळीराजाला हात देण्यासाठी तातडीने ५० हजार रु. प्रति हेक्टरी मदत जाहीर करावी आणि कर्जमाफीसाठी अधिक वाट न बघता #हिच_ती_योग्य_वेळ हेही ध्यानात घ्यावं…!
काही नेते स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी मोर्चांचं प्रतिनिधीत्व करत आहेत. पण मोर्चाला येणाऱ्या लोकांच्या घरातली चूलही या अतिवृष्टीने विझलीय. त्यामुळं जाती-जातीत वाद निर्माण करण्याऐवजी या मोर्चात त्यांनी शेतकऱ्यांची बाजू ठामपणे मांडली तर अधिक योग्य ठरेल. वास्तविक राज्यात आणि केंद्रातही सत्तेत असताना त्यांना आपल्या मागण्यांवर एकत्रित बसून योग्य मार्ग काढणं शक्य आहे, पण त्याऐवजी सत्तेत असतानाही ते मोर्चे का काढत आहेत, हेही त्यांनी लोकांना सांगावं.