सोलापूर : कोरोना काळात जिल्हा आरोग्य विभागात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप आमदार राम सातपुते यांनी केला. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत आमदार सातपुते यांनी आरोप केल्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला. 


एसडीआरएफ फंडातून जिल्ह्याला कोट्यवधींचा निधी प्राप्त झाला होता. मात्र या निधीत भ्रष्टाचार झाला आहे. याची सीबीआयमार्फत चौकशी करण्यात यावी. अशी मागणी भाजप आमदार राम सातपुते यांनी केली. सीबीआयकडे मी स्वतः तक्रार करणार असे सातपुते यांनी म्हणताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करू असे म्हणत खिल्ली उडवली. तसेच जर असे काही झाले असेल तर त्याची चौकशी करण्यास आपल्या यंत्रणा सक्षम असल्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि आमदार संजय शिंदे म्हणाले. 


आमदार सातपुते यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून सीबीआय चौकशीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी देखील त्यांना धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. आमदार राम सातपुते सीबीआय चौकशीच्या मागणी करत आहेत, मात्र त्यांच्या माळशिरस मतदारसंघात वंचित समाजातील व्यक्तीला स्मशानभूमी मिळाली नाही. त्याला जबाबदार कोण याची देखील चौकशी करायला हवी असे म्हणत नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी जोरदार टीका केली. यावरून सभागृहातील वातावरण प्रचंड तापले.


आपण त्या कुटुंबियांना भेटायला गेलो होतो. ते गाव माझ्या मतदारसंघात देखील नाही असा खुलासा यावेळी आमदार सातपुते यांनी केला. जिल्ह्यातील सर्व आमदारांना वंचिताची मते हवीत. त्यांच्या स्मशानभूमीचे प्रश्न का सोडवत नाही. यावर सर्व आमदारांची एक बैठक व्हायला हवी. अशी मागणी यावेळी आनंद चंदनशिवे यांनी केली. दरम्यान या संदर्भात लवकरच बैठक घेऊ असे आश्वासन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. 


सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या वीज तोडणीवरून देखील मोठा गदारोळ झाला. गाळप हंगाम आता सुरू झाला आहे. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडू नये. तसेच गावठाण भाग आणि पाणी पुरवठा योजनेचे वीज कनेक्शन देखील तोडण्यात येऊ नये अशी मागणी आमदार संजय शिंदे यांनी केली. आमदार शिंदेच्या या मागणीला सर्वपक्षीय आमदार आणि नेत्यांनी समर्थन दिले. सभागृहाच्या भावना लक्षात घेत गावठाण भागाच्या विजेचे कनेक्शन तसेच पाणी पुरवठा योजनेचे कनेक्शन तोडू नये अशा सूचना पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच शेतकऱ्यांच्या वीज कनेक्शनचा मुद्दा हा राज्य शासनाचा असून सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदाराना सोबत घेऊन येत्या दोन दिवसात ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भेट घेऊ. अशी माहिती देखील पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी दिली. 


महत्वाच्या बातम्या :