Sindhutai Sapkal : अनाथांची माय अशी ओळख असलेल्या ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिंधुताई सपकाळ यांचं मंगळवारी रात्री पुण्यातल्या गॅलक्सी रूग्णालयात निधन झालं. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक अत्याचारांना बळी पडलेल्या सिंधुताईंनी महाराष्ट्रात अनाथाश्रम स्थापन केलेत. त्यांना अन्न, शिक्षण आणि निवारा उपलब्ध करुन दिला. 'अनाथांची माय' असलेल्या सिंधुताई यांच्या जाण्यानं त्यांची लेकरं पोरकी झाली असून संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली जात आहेत.
शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी अनाथांसाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांना अनेक पुरस्काराने गौरवण्यात आलं आहे. त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते 2021 सालचा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यांना पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. 'अनाथांची माय' अशी ओळख असलेल्या सिंधुताईंना तब्बल 750 हून अधिक पुरस्कारांने गौरवण्यात आलं आहे. सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
सिंधुताई यांनी स्थापन केलेल्या संस्था
बाल निकेतन हडपसर, पुणे
सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह , चिखलदरा
अभिमान बाल भवन, वर्धा
गोपिका गाईरक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)
ममता बाल सदन, सासवड
सप्तसिंधु महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे
माईंनी आपल्या कार्यासाठी आंतरराष्ट्रीय निधी मिळावी या हेतूने 'मदर ग्लोबल फाउंडेशन'ची स्थापना केली. माईंच्या जीवनावर आधारलेला 'मी सिंधुताई सपकाळ' हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स ॲन्ड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट 2014 साली प्रदर्शित झाला आहे.
संबधित बातम्या :
Sindhutai Sakpal : 'उपेक्षितांसाठी सिंधुताईंचं काम खूप मोठं', पंतप्रधान मोदींकडून शोकसंवेदना
अनाथांची माय हरपली! पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन, आज दुपारी अंत्यसंस्कार
Sindhutai Sapkal : 'नकुशी' असणारी चिंधी ते अनाथांच्या आयुष्याचं सोनं करणारी माय; असा होता सिंधुताई सपकाळांचा जीवनप्रवास
Sindhutai Sapkal : 'अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली', सिंधुताईंच्या निधनानंतर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक