सांगली : स्मृती मानधना ही भारतीय महिला क्रिकेटमधील एक नवीन तारा म्हणून उदयास येते आहे. महिला विश्वचषक स्पर्धेत तिने तडाखेबाज फलंदाजी करत लागोपाठ दोन विजय खेचून आणले. यामुळे सांगलीसह महाराष्टची शान स्मृतीच्या कामगिरीने देशभर उंचावली आहे.


स्मृती श्रीनिवास मानधना... वय अवखे 20 वर्षे... स्मृतीचं नाव आज संपूर्ण जगभर क्रिकेटच्या माध्यमातून पोहोचलं आहे. 18 जुले 1996 रोजी मुंबईत जन्मलेल्या स्मृतीचे कुटुंब स्मृती अवघी 4 वर्षांची असताना सांगलीत आले. स्मृतीचे वडील निष्णात क्रिकेटपटू. पण व्यवसायाच्या निमित्ताने त्यांना हा क्रिकेट फार काळ पुढे खेळता आला नाही. मात्र, आपल्या मुलामध्ये त्यांनी क्रिकेटर होण्याचे  स्वप्न पाहिले. मुलाला प्रशिक्षण देताना नकळत स्मृतीला देखील क्रिकेटचे वेड कधी लागले हे कुणालाच कळले नाही आणि वयाच्या नवव्या वर्षी स्मृतीला क्रिकेटचे अधिकृत बाळकडू मिळायला सुरुवात झाली. आजच्या तिच्या या यशाने तिच्या आई-वडिलांच्या आनंदला पारावर उरला नाही.

दहावीपर्यंतचे शिक्षण सांगलीतच घेत असताना स्मृतीने क्रिकेटचा चांगला सराव केला. सांगलीतीलच छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ती क्रिकेटचा सराव करत असे. तिच्या सरावाची पद्धत आणि कष्ट घेण्याची तयारी यावरून ही मुलगी भविष्यात मोठी क्रिकेटपटू होईल, असा विश्वास होता असे तिचे सांगलीतील फिटनेस ट्रेनर एस. एल. पाटील यांनी सांगितले. याशिवाय आमच्यासोबत सराव करणारी स्मृतीने आज क्रिकेटच्या माध्यमातून मोठे नाव कमवल्याबद्दल तिच्या मैत्रिनी देखील तिचे कौतुक करत आहेत.



स्मृती तशी उजव्या हाताने लिखाण करणारी. पण तिच्या वडिलांनी आणि ट्रेनरनी तिला जाणिवपूर्वक डावखुरी फलंदाज बनवलं. यामुळे आज स्मृती ही दिमाखदार कामगिरी करत आहे. शिवाय, अनेक दुखापतींना सामोरे जात स्मृतीने ही चमकदार कामगिरी केल्याचे तिचे फिटनेस ट्रेनर सांगतात.

स्मृतीचा आतापर्यंतचा प्रवास :

  • 18 जुलै 1996 रोजी मुंबईत जन्म

  • 2000 साली मानधना कुटुंब सांगलीत स्थायिक

  • सांगलीत कृष्णा व्हॅली स्कूलमध्ये स्मृतीचं दहावीपर्यंतचं शिक्षण

  • पुढे अकराव-बारावीचं शिक्षण सांगलीतील चिंतामणी कॉलेजमध्ये

  • स्मृती सध्या बीकॉमच्या पहिल्या वर्षात शिकते आहे.

  • स्मृती नऊ वर्षांची असताना अंडर-15 मध्ये महाराष्ट्रासाठी खेळली होती.

  • अकराव्या वर्षी स्मृती अंडर-19 मध्ये खेळली

  • स्मृती लिखाण जरी उजव्या हाताने करत असली, तरी फलंदाजीत डावखुरी आहे.

  • भारतीय महिला क्रिकेटमध्ये द्विशत करणारी स्मृती पहिली खेळाडू

  • भारतीय संघात दमदार सलामीवीर म्हणून आपली ओळख निर्माण करणाऱ्या मानधनाला 2016 च्या आयसीसीच्या महिला संघामध्ये स्थान मिळाले होते.

  • आंतराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडून जारी करण्यात येणाऱ्या संघात स्थान मिळवणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू आहे.