सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील देवाचं गाव म्हणून ओळख असलेल्या देवबाग गावाला तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलं असल्याने पावसाळ्यात गावकऱ्यांना जीव मुठीत धरुन राहावं लागतं. एक बाजूने अरबी समुद्र तर एका बाजूने खाडी आणि या दोघांमध्ये वसलेलं देवबाग गाव. पावसाळ्यात येणाऱ्या समुद्राच्या लाटांमुळे गाव समुद्र गिळंकृत करत चालला आहे. गाव वाचवायचं असेल तर धूपप्रतिबंधात्मक बंधारा आवश्यक आहे. मात्र राणे विरुद्ध शिवसेना असा वाद या देवबाग गावातील बंधाऱ्याला पण पाहायला मिळत आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या खासदार निधीतून बंधारा मंजूर करुन भूमिपूजन केलं. मात्र या बंधाऱ्यासाठी योग्य त्या परवानग्या मिळालेल्या नसल्याचं समोर येत आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. यावरुन आता शिवसेना-राणे वाद सुरु झाला आहे. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या परवानग्या अडवल्याचा आरोप भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून 302 चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही शिवसेना आमदार, खासदार, मंत्र्यांना फिरु देणार नाही, असा इशारा निलेश राणेंनी दिला आहे.


मालवण तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर वसलेलं देवबाग गावातील बंधार्‍याचे काम होऊ नये यासाठी स्थानिक आमदार वैभव नाईक राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून या कामात अडचणी निर्माण करत आहेत, असा आरोप करत येत्या पावसाळ्यात जर देवबागमधील एकाचा जरी जीव गेल्यास यांच्याविरोधात न्यायालयातून 302 चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. शिवाय यांना मालवणातच काय तर जिल्ह्यातही फिरु देणार नाही असाही इशारा दिला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वैभव नाईकांच्या सांगण्यावरुन परवानग्या अडवल्याचा आरोप निलेश राणेंनी करत पावसाळ्यात देवबागला समुद्री लाटांचा तडाखा बसून कोणाचा बळी गेल्यास न्यायालयातून यांच्याविरोधात 302 चा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडू अस म्हटलं आहे. देवबाग येथील संरक्षक बंधार्‍याच्या कामासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. याला जिल्हाधिकार्‍यांनी मान्यता दिली असून प्रशासकीय मान्यताही मिळाली आहे. या बंधार्‍याचे काम मार्गी लागावे यासाठी पर्यावरण खात्याची परवानगी आवश्यक आहे. मात्र स्थानिक आमदाराने हे काम राणेंचं असल्याने पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना सांगून हे काम थांबवलं आहे. खालच्या पातळीचे राजकारण ही लोकं करत आहेत. त्यांना लोकांचे जीव महत्त्वाचे नाहीत. या कामाला राणेंनी निधी दिला त्यांना तो वापरता येता नये यासाठी अडचणी निर्माण करण्याचे काम केले आहे. काही झाले तरी हे काम होता नये म्हणून अडचणी निर्माण केल्या जात आहेत. याची स्थानिक आमदार व पर्यटन मंत्र्यांना लाज वाटत नाही? मंत्रीपदाची शपथ कशासाठी घेतो आपण? याचा विचार त्यांनी करावा. हा राणेंचा विषय नसून देवबागमधील स्थानिक ग्रामस्थांच्या जीविताचा विषय आहे. समुद्राचे पाणी गावात घुसले तर एकही जीव शिल्लक राहणार नाही. यांना लाज आहे की राजकारणासाठी सर्व काही विकून टाकले, अशी टीका त्यांनी केली. 


मालवणमधील देवबाग बंधाऱ्याला भाजपकडून एक कोटी रुपये आणले असे सांगत कोणत्याही प्रकारची वर्कऑर्डर नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पुत्र प्रेमाखातर केले. यामुळे खऱ्या अर्थाने जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार झाला आहे. देवबाग ग्रामस्थच राणे पितापुत्रांवर 302 चा गुन्हा दाखल करतील. मान्यता नसलेल्या बंधाऱ्याचे भूमिपूजन करुन लोकांची सहानुभूती मिळवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी केली आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग गावातील बंधाऱ्यावरुन शिवसेना आणि राणे आमनेसामने आले आहेत. राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असून देवबागवासियांना मात्र यावर्षी पावसाळा आपला जीव मुठीत धरुन काढावा लागणार आहे. ऐन पावसाच्या तोंडावर बंधाऱ्यावरुन शिसेना आणि राणे यांचा वाद समोर आला आहे.