Sikandar Shaikh : सिकंदर शेखला जामीन मंजूर, पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करीमध्ये होती अटक
Sikandar Shaikh Bail : पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती. त्याला आता जामीन मंजूर करण्यात आला आहे.

मुंबई : महाराष्ट्र केसरी आणि आंतरराष्ट्रीय पैलवान सिकंदर शेखला (Sikandar Shaikh) पंजाबमधल्या शस्त्रास्त्रं तस्करी प्रकरणात (Punjab Arms Smuggling Case) जामीन मंजूर झाला आहे. सिकंदर शेखच्या नावावर या आधी कोणताही गुन्हा नव्हता, तसेच तो देशाचा मोठा पैलवान असल्याची बाब लक्षात घेऊन त्याला जामीन मंजूर करण्यात आला आहे. पंजाबमध्ये शस्त्रास्त्रांच्या तस्करी प्रकरणात सिकंदर शेखला अटक करण्यात आली होती.
पंजाब पोलिसांनी सिकंदर शेखला शुक्रवारी केलेल्या अटकेमुळं महाराष्ट्रातल्या कुस्ती वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. पंजाबमधल्या पपला गुर्जर टोळीला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्याच्या आरोपाखाली सिकंदरसह चौघांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी तिघांची पार्श्वभूमीवर ही गुन्हेगारी स्वरुपाची होती.
सिकंदर शेखच्या नावावर कोणताही गुन्हा नव्हता. पण सिकंदर शेख हा महाराष्ट्राचा आणि देशाचाही मोठा पैलवान असल्याचं पटवून दिल्यानंतर त्याला जामीन मिळणं शक्य झालं असल्याची माहिती समोर येत आहे.
Sikandar Shaikh Case : शस्त्रास्त्र तस्करी प्रकरणात अटक
सिकंदर शेखला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली होती. पंजाब पोलिसांच्या पथकाने पपला गुर्जर गँगला शस्त्र पुरवणाऱ्या रॅकेटचा भंडाफोड करत चार जणांना अटक केली होती. त्यात सिकंदर शेखचाही समावेश होता. पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख रक्कम, 5 पिस्तुलं, काही काडतुसे आणि स्कॉर्पिओ-एन व एक्सयूव्ही अशा दोन गाड्या जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पंजाबमधील खरड येथील पोलिस ठाण्यात आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या चार आरोपींपैकी सिकंदर शेखला जामीन मंजूर करण्यात आला आहे. तर उर्वरित तीन जणांचा जामीन नामंजूर करण्यात आला. त्या तीनही जणांवर या आधी खंडणी आणि इतर गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
Sikandar Shaikh Bail : सिकंदर निर्दोष, वडिलांचा दावा
सिकंदर शेखच्या आई-वडिलांनी त्याच्या निर्दोषतेचा दावा केला आहे. त्यांना वाटतं की सिकंदरला या प्रकरणात फसवलं गेलंय आणि चौकशीनंतर सत्य बाहेर येईल. सिकंदरचे वडील, पैलवान रशीद शेख म्हणाले की, “माझ्या मुलाने अत्यंत कष्टाने नाव कमावले आहे, कोणी तरी फसवून त्याला या प्रकरणात गुतवलं आहे. मी आयुष्यभर हमाली करून कमावलेत, मीच हरामचा पैसा कमावला नाही तर माझा मुलगा हरामची कमाई कसा कमवेल? सिकंदरला शेकडो गडा, गाड्या आणि सैन्यात नोकरी करण्याची संधी मिळाली. त्याला अशा प्रकारचं काही करण्याची गरजच नव्हती. हिंद केसरी स्पर्धा जवळ आली आहे, तो तयारी करत होता. त्याला खेळू न देण्यासाठी हे काही डावपेच तर नाहीत ना, हे मला समजत नाही.”
ही बातमी वाचा:

















