पुणे : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी डॉ. श्रीपाल सबनीसांनी पाठवलेल्या पत्राची दखल पंतप्रधानांनी घेतली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मराठी भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ निर्माण करावं, अशी मागणी करणारे पत्र अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी पंतप्रधानांना पाठवलं होतं.
श्रीपाल सबनीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ऑगस्ट महिन्यात पत्र लिहिलं होतं. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाची मागणी या पत्रातून केली होती. बलुचिस्तानमधील नागरिकांच्या मानवाधिकारांसोबतच पाकव्याप्त काश्मीरच्या स्वातंत्र्याचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केल्याबद्दल अभिनंदनही केलं होतं.
पंतप्रधान कार्यालयाकडून श्रीपाल सबनीस यांना पत्राची पोच पाठवण्यात आली आहे. पत्रातील मुद्द्यांवर सकारात्मक विचार करुन कार्यवाही करत असल्याचही सांगण्यात आलं आहे. "मराठीला अभिजात दर्जा मिळावा तसंच मराठी भाषेचं स्वतंत्र विद्यापीठासाठी अनेकांनी पाठपुरावा केला आहे. पण आपण पाठवलेल्या पत्रामुळे सर्वांच्या प्रयत्नांना यश मिळालं याचा आनंद वाटतो," असं डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितलं.