Shraddha Walker Death Case वसई: श्रद्धा वालकर हत्याकांडाला (Shraddha Walker Death Case) चार वर्षांचा काळ उलटला, तरी श्रद्धाच्या कुटुंबीयांना न्यायाची प्रतीक्षा कायम आहे. श्रद्धाची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली, त्या प्रकरणातील सुनावणीला होत असलेल्या विलंबावर श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी संताप व्यक्त केला आहे. त्याचवेळी, आपण श्रद्धासाठी माध्यमांशी बोलण्यास सुरुवात केल्यानंतर पाकिस्तानातून निनावी फोन येत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
आरोपीच्या शिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेवरही तीव्र प्रश्न उपस्थित- (Shraddha Walker Death Case)
मला भीती वाटते की हे फोन कशासाठी येत आहेत..? म्हणून मी फोन उचलत नाही. येणाऱ्या फोनचे स्क्रीनशॉट मी काढून ठेवले आहेत. मी फोन उचलला नसल्याने अद्याप कोणतीही धमकी देण्यात आलेली नाही. मात्र याबाबत पोलिसांत तक्रार करणार आहे, असा दावा राजल नाईक यांनी केला आहे. श्रद्धाच्या हत्येच्या कथित नियोजनाबाबत बोलताना त्यांनी आरोपीच्या शिक्षण आणि न्यायालयीन प्रक्रियेवरही तीव्र प्रश्न उपस्थित केले.
न्यायाधीश आणि वकील मॅनेज झालेत का? (Shraddha Walker Death Case)
श्रद्धाची ज्या प्रकारे प्लॅनिंग करून हत्या केली, त्यानुसार त्याचं डोकं एवढं शार्प आहे. त्याला शिकवून त्याचं डोकं आणखी सुपीक करायचं आहे का..? तो अजून किती मुलींचा मर्डर करू शकतो, याचं शिक्षण त्याला घ्यायचं आहे का..? असा संतप्त सवाल त्यांनी केला. जर त्याला फाशीची शिक्षा होणार असेल, तर त्याला एवढ्या शिक्षणाची गरज काय..? एवढी मुदत का द्यायची..? असा सवाल करत त्यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधला. महाराष्ट्रात अनेक प्रकरणांचे निर्णय वेगाने लागतात, मग केंद्राच्या अखत्यारितील या प्रकरणात एवढा विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. यावेळी राजल नाईक यांनी न्यायाधीश आणि वकील मॅनेज झालेत का..? असा थेट आरोप करत तारीख पे तारीख दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
श्रद्धाला न्याय कधी मिळणार? (Shraddha Walker Death Case)
श्रद्धाच्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण न झाल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. श्रद्धाच्या वडिलांनी मुलीच्या अवशेषांपैकी एक हाड मागितले होते, मात्र ते मिळाले नाही, असा दावा राजल नाईक यांनी केला. ते मिळालं असतं तर श्रद्धाच्या वडिलांना ते हयात असताना मुलीवर अंतिम संस्कार करता आले असते. त्यांची ही शेवटची आसही पूर्ण होऊ शकली नाही, अशी भावनिक प्रतिक्रिया त्यांनी दिली. आज श्रद्धाचे आई-वडील हयात नाहीत. तिचा भाऊ आहे; मात्र त्याला आम्ही समोर आणू इच्छित नाही. संपूर्ण देश वाट पाहतोय. श्रद्धाला न्याय कधी मिळणार..? असा सवाल करत आरोपीला लवकरात लवकर शिक्षा मिळावी, हीच श्रद्धाच्या वडिलांची शेवटची इच्छा होती आणि ती तरी पूर्ण व्हावी, अशी मागणी राजल नाईक यांनी केली आहे.
नेमकं प्रकरण काय? (Shraddha Walker Death Case)
श्रद्धा वालकर ही एक 27 वर्षीय तरुणी होती, जिची 18 मे 2022 रोजी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने दिल्लीतील छतरपूर येथील घरात निर्घृणपणे हत्या केली होती. आरोपी आफताबने हत्येनंतर श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले, ते महिनाभर 300 लिटरच्या फ्रीजमध्ये साठवले आणि नंतर वेगवेगळ्या जंगलात फेकून दिले। नोव्हेंबर 2022 मध्ये श्रद्धाच्या वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा खटला दिल्लीतील न्यायालयात प्रलंबित आहे. जुलै 2026 मध्ये, आरोपी आफताबला तिहार तुरुंगात एमए (समाजशास्त्र) ची परीक्षा देण्याची परवानगी मिळाल्यामुळे न्यायालयाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली. श्रद्धाला न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणारे तिचे वडील विकास वाळकर यांचे 2025 मध्ये निधन झाले होते.
