पालघर: मोखाडा नगरपंचायतीवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. आघाडीच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने, शिवसेनेचे अमोल पाटील नगराध्यक्षपदी तर उपनगराध्यक्षपदी नवसु दिघा बिनविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे मोखाडा नगरपंचायतीवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकला आहे
सदरची निवडणूक नगरविकास मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच पालघर जिल्हा संपर्कप्रमुख आमदार रविंद्र फाटक यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्यात आली आहे. या निवडणुकीनंतर शिवसैनिकांनी फटाके फोडून आणि विजयाच्या घोषणा देत आनंदोत्सव साजरा केला आहे.
नगरपंचायतीची निवडणुक झाल्यानंतर महिन्यानंतर नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक झाली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना आणि जिजाऊ सामाजिक संघटनेची युती झाली होती. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून अमोल पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. तर काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी आणि माकप आघाडीकडून प्रमोद कोठेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
नगराध्यक्ष पदाची निवडणूक 23 फेब्रुवारीला होणार होती, मात्र, एक दिवस अगोदर 22 फेब्रुवारीला आघाडीचे ऊमेदवार प्रमोद कोठेकर यांनी ऊमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्यामुळे आज अधिकृतरित्या शिवसेनेचे अमोल पाटील यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. तर उपनगराध्यक्षपदी नवसु दिघा हे देखील बिनविरोध निवडून आले आहेत. नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षाचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- Kirit Somaiyya : अनिल देशमुख, नवाब मलिकांनंतर आता तिसरा नंबर अनिल परबांचा? सोमय्यांचा इशारा
- Nawab Malik : स्क्रॅप मर्चंट ते मंत्री, असा आहे नवाब मलिकांचा राजकीय प्रवास
- Nawab Malik: नवाब मलिकांच्या अटकेनंतर ED ने सत्र न्यायालयात काय दावा केला? काय म्हणाले नवाब मलिक?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha